कर्बवायू साठवणीसाठी करा दक्षिण- उत्तर ऊस लागवड

कर्बवायू साठवणीसाठी करा दक्षिण- उत्तर ऊस लागवड
पूर्व-पश्चिम लागवडीमध्ये कर्बवायू वाहून गेल्याने पिकांच्या वाढीवर विपरीत परिणाम होऊ शकतो. दक्षिण उत्तर लागवडीमध्ये कर्बवायू अधिक काळ साठून पिकांकडून शोषला गेल्याने उसातील अन्ननिर्मिती प्रक्रिया वेगाने होते. त्याचा फायदा उत्पादनवाढीसाठी होतो. थोडक्यात, ऊस लागवडीची दिशा आणि कर्बवायू साठवण यामधील संबंध सरळ उत्पादन वाढीशी जोडला जातो.

उसामध्ये ठिबक सिंचन संच बसविण्याचे निश्चित झाल्यानंतर कृषी अभियंत्यास बोलवून क्षेत्राचे सर्वेक्षण करून घ्यावे. या सर्वेक्षणामध्ये जमिनीचा प्रकार, उतार, पाण्याचे साधन व ताशी पाणी देणारा पंप, उन्हाळ्यात पाण्याची उपलब्धता व भविष्यात होणारे वाढीव क्षेत्र याचा विचार केला जातो. त्यानुसार योग्य आराखडा तयार करून घ्यावा. तयार केलेल्या आराखड्यामध्ये आपण स्वत:हून काहीही बदल करू नयेत.
आराखडा तयार करतेवेळी उसाची लागण दक्षिण-उत्तर होेईल, याचा विचार करावा. पूर्व-पश्चिम लागवडीपेक्षा दक्षिण-उत्तर लागवड केलेल्या उसाचे उत्पादन १२ ते १५ टक्के नेहमी अधिक येते.या पद्धतीने केलेल्या लागवडीतील उसाच्या पानाचा १०० वर्गसेंटिमीटर भाग ताशी २.०८ मिलीग्रॅम ते १०.०१ मिलीग्रॅम कार्बन डाय ऑक्साईडचे शोषण करत असल्याचे प्रयोगात संशोधकांना (१९२०) आढळले आहे.एका उसाला तीन ते चार महिन्यांनंतर कायमस्वरूपी दोन सरीतील अंतरानुसार १२ ते १६ पाने हिरवी असतात. या पानाचे आकारमान ६ ते ८ हजार वर्ग सेंटिमीटर होईल. कर्बशोषणात होणाऱ्या वाढीमुळे उत्पादनातही वाढ होते
उसाची लागवड आणि कर्बवायू शोषण यांचा संबंध

गुडींग (१९४२) यांनी केलेल्या अभ्यासाचे निष्कर्षानुसार, एका उसासाठी दररोज ६००० वर्ग सें.मी. पानाचे आकारमान असणाऱ्या जाती (उदा. को-८६०३२, को- ७२१९ इत्यादी) ३०२.४० ग्रॅम कार्बन डाय ऑक्साईड तर ८००० वर्ग सें.मी. साठी ४०३ ग्रॅम कार्बन डाय ऑक्साईडची गरज असते. तसेच त्याच्या शोषणाचे प्रमाण सकाळी ८ ते १० व दुपारी २ ते ४ या कालावधीत सर्वात जास्त असते. कार्बनडाय ऑक्साईडची घनता (जडत्व) जास्त असल्याने तो जमिनीपासून २ ते २.५ फुटांपर्यंतच जास्त असतो.
आपल्याकडे वर्षभरामध्ये एकूण वाहणाऱ्या वाऱ्यापैकी जवळपास ६५ ते ७० टक्के वारा हा पूर्वेकडून पश्चिमेकडे किंवा पश्चिमेकडून पूर्वेकडे वाहात असतो. उरलेला ३० ते ३५ % वारा हा दक्षिण-उत्तर किंवा उत्तर-दक्षिण वाहात असतो. जर आपण उसाची लागवड पूर्व-पश्चिम केल्यास वाऱ्याच्या प्रवाहामुळे जमिनीलगत असणारा कार्बनडाय ऑक्साईड वायू आपल्या शेतातून जास्त प्रमाणात वाहून जातो. याउलट दक्षिण-उत्तर लागवडीमध्ये वाऱ्याला अडथळा निर्माण झाल्यामुळे जमिनीलगत असणारा कार्बन डाय ऑक्साईड वायू वाहून जाण्याचे प्रमाण कमी होते. कर्बवायू उसाच्या फडामध्ये जास्त प्रमाणात राहिल्याने ऊस पीक शोषून घेते.
वारा वाहण्याचे प्रमाण सकाळी ८ ते १० व दुपारी ३ ते ५ या वेळेत जास्त असते. या कालावधीत ऊस पीक कार्बन डाय ऑक्साईड घेण्याचे प्रमाणही जास्त असते. बी.एन. सिंग व के. एन. लाल (१९३५) या शास्त्रज्ञाच्या मते, पानामध्ये अन्न तयार करण्याचे प्रमाण वातावरणातील कार्बन डाय ऑक्साईडचे प्रमाण कमी जास्त होण्यावर अवलंबून असते. त्याचबरोबर वातावरणामध्ये उसाच्या फडाच्या बाहेर ३२० पीपीएम व ऊस फडामध्ये ५०० पीपीएम पासून ते ६०० पीपीएम पर्यंत कार्बन डाय ऑक्साईडचे प्रमाण राहते.
बांधावर शेवरीची लागवड फायद्याची…
काही ठिकाणी अनेक कारणांमुळे दक्षिण उत्तर लागवड शक्य होत नाही. यात शेताची लांबी-रुंदी, जमिनीचा उतार, सोईस्कर रस्ता, शेती करण्याची सवय अशा अनेक अनेक अडचणी असतात. पूर्व-पश्चिम लागवड केल्यास उसाच्या सर्व बाजूंनी वारा थोपविण्यासाठी / थांबविण्यासाठी शेवरी अथवा जनावरांच्या चाऱ्यासाठी उंच वाढणाऱ्या गवताचा ताटवा लावावा. कर्बवायू फडामध्ये रोखणे शक्य होते. ऊस उत्पादनात घट येणार नाही. पूर्वी ऊस लागवडीनंतर शेवरीचा ताटवा / ओळ लावली जात असे. मात्र, अलीकडे शेवरी काढण्यासाठी शेतमजूरांची उपलब्धता किंवा आंतर मशागतीसाठी होणारी अडचण या कारणामुळे शेवरी लावत नाहीत. शेवरी लावणे हे ऊस उत्पादनवाढीसाठी शास्त्रीय दृष्ट्या फायद्याचे ठरते.

(more)