रब्बी ज्वारीच्या योग्य जाती पेरा

रब्बी ज्वारीच्या योग्य जाती पेरा
रब्बी ज्वारीची उत्पादकता कमी असण्याचे प्रमुख कारण म्हणजे जिरायती पद्धतीने लागवड. अनिश्चित स्वरूपाचा पाऊस, हलकी, मध्यम खोल काळी व भारी जमीन अशी वैविध्यपूर्ण जमिनीत लागवड अशा कारणांमुळेही समाधानकारक उत्पादन मिळत नाही. त्यामुळे लागवडीसाठी महत्त्वाच्या बाबींचा विचार करून नियाेजन केल्यास उत्पादनात वाढ साधता येते.

पावसाच्या आेलीवर १५ ऑक्टोबरपर्यंत ५ सें.मी. खोलीपर्यंत पेरणी करावी. प्रतिहेक्टरी १.४८ लाख रोपसंख्या ठेवावी. त्यासाठी पेरणी ४५ x १५ से.मी. अंतरावर करावी.
हलक्या जमिनीत फुले माऊली, फुले अनुराधा तर मध्यम जमिनीत फुले चित्रा,
फुले सुचित्रा या जातींची पेरणी करावी. भारी जमिनीत फुले यशोदा, फुले वसुधा या जातींची पेरणी करावी.
पेरणीपूर्वी प्रति किलो बियाण्यास ४ ग्रॅम गंधकाची (३०० मेश), त्यानंतर २५ ग्रॅम अॅझोटोबॅक्टर व २५ ग्रॅम स्फुरद विरघळविणारे जीवाणूंची प्रक्रिया करावी.
हेक्टरी ५० किलाे नत्र, २५ किलो स्फुरद व २५ किलो पालाश अशी खते द्यावीत. नत्र दोन हप्त्यात विभागून द्यावे. जमिनीत कमी ओलावा असल्यास पेरणीवेळी २५ किलो नत्र द्यावे. उर्वरित नत्र पेरणीनंतर ३० दिवसांनी द्यावे. स्फुरद २५ किलो व पालाश २५किलो पेरणीच्या अगोदर द्यावे.
जिरायती ज्वारीमध्ये पहिली कोळपणी पेरणीनंतर ३ आठवड्यांनी फटीच्या कोळप्याने द्यावी. त्यामुळे तणांचे नियंत्रण व पिकाला मातीची भर दिली जाते. दुसरी कोळपणी पेरणीनंतर ५ आठवड्यांनी अखंड फासाच्या कोळप्याने करावी. तिसरी कोळपणी पेरणीनंतर ८ आठवड्यांनी जमिनीत पडणाऱ्या भेगा बुजवण्यासाठी दातेरी कोळप्याने करावी.

बागायती ज्वारीस पहिली कोळपणी पेरणीनंतर ३ आठवड्यांनी फटीच्या कोळप्याने करावी. दुसरी कोळपणी ४ ते ५ आठवड्यांनंतर अखंड फासाच्या कोळप्याने करावी.
ज्वारीच्या गर्भावस्थेत म्हणजेच पेरणीनंतर ३० ते ३५ दिवसांनी पहिले पाणी व पोटरी अवस्था म्हणजे ५० ते ६० दिवसांनी पाणी द्यावे. एकच पाणी उपलब्ध असल्यास पेरणीनंतर ३० ते ३५ दिवसांनी द्यावे.

(more)