साकेगाव येथे शेतकरी मेळावा व वृक्षारोपण मोहीम संपन्न-15-9-2019

साकेगाव येथे शेतकरी मेळावा व वृक्षारोपण मोहीम संपन्न-15-09-2019
साकेगाव ता.पाथर्डी येथे कृषी विज्ञान केंद्र दहिगाव-ने यांचे माध्यमातून शेतकरी मेळावा संपन्न झाला. यावेळी उपस्थित शेतक-यांना रब्बी पिके व जलसंधारण याबद्दल मार्गदर्शन करण्यात आले. याच मेळाव्यामध्ये गावातील शेतक-यांना वृक्ष वाटप करून मोठ्या स्वरुपात मोहिम संपन्न झाली.

या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी साकेगाव मधील सामाजिक कार्यकर्ते श्री. गोरक्षनाथ सातपुते (आण्णा), श्री मारुतराव घुले पाटील शिक्षण संस्थेचे सहसचिव श्री. काकासाहेब शिंदे, कृषी विज्ञान केंद्राचे वरिष्ठ शास्त्रज्ञ व प्रमुख डॉ. श्याम सुंदर कौशिक व त्यांचे सर्व सहकारी, महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरी येथील वरिष्ठ शास्त्रज्ञ डॉ. सुधीर दहिवाळकर, सहाय्यक संशोधक डॉ. रजनी साळुंके, श्री. निखील दुग्गड, श्री. दत्तात्रय पवार, जलमित्र श्री. सुखदेव फुलारी, साकेगाव चे सरपंच श्री. सुधाकर बळीद, श्री. विष्णूपंत सातपुते, कृषी सहाय्यक श्री. लांडगे, आत्मा चे सुजित गायकवाड इ. व्यासपीठावर उपस्थित होते.
सद्य दुष्काळी परिस्थिती व वातावरणात होत असलेल्या बदलाला सामोरे जाण्यासाठी भारत सरकार व महाराष्ट्र शासन विविध उपक्रम राबवत आहे. या अनुषंगाने कृषी विज्ञान केंद्र दहिगाव-ने मार्फत कृषी मेळाव्याचे आयोजन व वृक्ष वाटप साकेगाव याठिकाणी करण्यात आले. भूजल पुनर्भरण हि काळाची गरज असून त्याकरिता म.फु.कृ.वि.राहुरी ने किफायतशीर किमतीमध्ये विहीर पुनर्भरण व कुपनलिका पुनर्भरनाचे तंत्रज्ञान विकसित केले आहे. या तंत्रज्ञानाचा शेतक-यांनी आपल्या शेतावर अवलंब करावा असे आवाहन डॉ. दहिवाळकर यांनी केले. हवामानावर आधारित व पाण्याच्या काटेकोर वापरासाठी म.फु.कृ.वि.राहुरी यांनी विकसित केलेल्या मोबाईल अॅप विषयी सविस्तर माहिती डॉ. रजनी साळुंके यांनी शेतक-यांना दिली. पडलेल्या पावसाच्या पाण्याचा जलसंचय करणे म्हणजेच रेनवॉटर हार्वेस्टिंग होय. यासाठी शेताची बांधबंदिस्थी, ओढे-नाल्यावरती पाणी आडवण्याचे उपाय तसेच घराच्या छतावरती पडणा-या पावसाच्या पाण्याच्या जलसंचयाचे विविध उपाय करणे आजची काळाची गरज आहे. पडणा-या पावसाच्या पाण्याचा जलसंचय, बँकेतील पैशाप्रमाणे आहे. जशी गरज पडेल तसा त्या पाण्याचा वापर करता येईल असे प्रतिपादन जलमित्र सुखदेव फुलारी यांनी केली.
तसेच रब्बी हंगामामध्ये घेतल्या जाणा-या हरभरा उत्पादन तंत्रज्ञानाची माहिती डॉ. कौशिक यांनी उपस्थित शेतक-यांना दिली. कांदा लागवड तंत्रज्ञान व ज्वारी उत्पादन तंत्रज्ञानातील पंचसूत्रीची माहिती कृषी विज्ञान केंद्राचे शास्त्रज्ञ नंदकिशोर दहातोंडे व नारायण निबे यांनी दिली. उपस्थित शेतक-यांना संबोधित केल्यानंतर कृषी विज्ञान केंद्रामार्फत शेतक-यांना फळ व वन वृक्षांचे वाटप करण्यात आले. वातावरणाचा समतोल राखण्यासाठी वृक्ष लागवडीचे महत्त्व काकासाहेब शिंदे यांनी उपस्थित शेतक-यांना सांगितले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सचिन बडधे यांनी केले तर आभार प्रकाश हिंगे यांनी मानले.

(more)