तूर उत्पादन वाढीचे सुधारित तंत्रज्ञान

Agronomy

तूर उत्पादन वाढीचे सुधारित तंत्रज्ञान
प्रस्तावना:
तूर हे महाराष्ट्रातील एक महत्वाचे कडधान्य आहे. तुरीचे पिक देशातील सर्व राज्यांमध्ये वेगवेगळ्या परिस्थितीमध्ये घेतले जाते. कडधान्य पिके हि प्रथिनांचे प्रमुख स्रोत आहेत. अशा प्रकारे डाळीमधील प्रथिनांचे मानवी आहारामध्ये अनन्य साधारण महत्व असून मानवाचे शरीर स्वस्थ ठेवण्यासाठी फार उपयोगी आहेत.

क्षेत्र आणि उत्पादन :
महाराष्ट्र राज्यामध्ये कडधान्य पिकाखाली ३२.७५ लाख हेक्टर क्षेत्र असून, उत्पादन २४.१३ लाख टन आणि उत्पादकता ७३७ किलो प्रति हेक्टर आहे. तर देशामध्ये एकूण कडधान्य पिकाखालील क्षेत्र २३४.७० लाख हेक्टर असून, त्यापासून १८३.४० लाख टन उत्पादन मिळते आणि उत्पादकता ७५० किलो प्रति हेक्टर अशी आहे.
हवामान आणि जमीन:
हवामान:
तूर पिकांस २१ ते २४ अंश से. तापमान चांगले मानवते. भारी जमिनीत कमी पाण्याच्या ठिकाणी जास्तीत जास्त ३० ते ३५ अंश से तापमानात सुद्धा तुरीचे चांगले पिक येते. तुरीचे पिक वार्षिक सरासरी ७५० ते १००० मि.मी. पावसात चांगले येते.तूर पिकास पेरणीनंतर १ ते १.५ महिन्याच्या कालावधीत नियमित पाऊस असणे फायद्याचे असते. जास्त पर्जन्यमान असलेल्या ठिकाणी शेतात पाणी साचून राहणार नाही याची काळजी घेणे आवशयक आहे. तुरीस फुले व शेंगा भरण्याच्या कालावधीत कोरडे व समशीतोष्ण हवामान आवश्यक आहे.
जमीन:
मध्यम ते भारी (३० ते ४५ सें.मी. खोल) पाण्याचा उत्तम निचरा होणारी जमीन तुर पिकास उपयुक्त आहे. चोपण व पाणथळ जमिनीत तुरीचे पिक चांगले येत नाही. पिकाच्या वाढीसाठी जमिनीचा सामू ६.५ ते ७.५ असावा.
पूर्वमशागत:
जमिनीची चांगली खोल नांगरट करावी आणि उन्हाळ्यात जमीन चांगली तापू द्यावी. त्यामुळे जमिनीतील किडी, अंडी व कोष इ. नष्ट होतात. मान्सूनचा पाऊस झाल्यावर वापसा येताच १-२ कुळवाच्या पाळया देऊन काडीकचरा स्वच्छ वेचून जमीन पेरणीसाठी तयार ठेवावी. शेवटच्या कुळवणीच्या अगोदर ५ टन चांगले कुजलेले शेणखत किंवा कंपोस्ट खत टाकावे.
स्थानिक उन्नत आणि संकरीत वाण : (योग्य वाणांची निवड):
१.आय.सी.पी.एल.-८७:
हा वाण १२० ते १३० दिवसात काढणीस तयार होतो. या वाणाचे उत्पादन १८-२० क्विंटल /हे. असून हा वाण मर्यादित वाढीचा, झुपक्याने शेंगा येणारा, सर्वाधिक लवकर तयार होणारा वाण आहे.
२. ए.के.टी.-८८११:
हा वाण १४० ते -१५० दिवसात काढणीस येतो. उत्पादन १५ ते १६ क्विंटल/हे. हा लवकर तयार होणारा वाण असून सलग तसेच अंतरपिकासाठी योग्य वाण, मध्यम आकाराचे तांबडे दाणे असणारा वाण आहे.
३.विपुला:
१४५ ते १६०दिवसात तयार होणारा वाण असून उत्पादन २४ ते २६ क्विंटल / हे येते. सलग तसेच अंतरपिक पद्धतीसाठी, भरघोस उत्पादन देणारा वाण, मर तसेच वांझ रोगास मध्यम प्रतिकारक वाण.
४.राजेश्वरी:
१४०-१५० तयार होणारा, उत्पादन २८ ते ३० क्विंटल/हे. हा वाण मर तसेच वांझ रोगास मध्यम प्रतिकारक्षम, लवकर पक्वता, तांबड्या रंगाचे टपोरे दाणे असणारा वाण.
५.बी.डी.एन.७११:
हा वाण १५० ते १६० दिवसात तयार होणारा वाण असून हेक्टरी उत्पादकता १८ ते २० क्विंटल येते. हा वाण निमपसरा , दाणे रंगाने पांढरे टपोरे, १०० दाण्यांचे वजन १०-१२ ग्रँ. मर आणि वांझ रोगास प्रतिकारक वाण आहे.
बी.डी.एन. ७०८ :
सलग तसेच आंतरपिक पद्धतीसाठी योग्य वाण १६०-१७०१६-१८
बी.एस.एम.आर.८५३ :
मध्यम आकाराचे तांबडे दाणे, मर व वांझ रोगास प्रतिकारक, सलग व आंतरपीक पद्धतीसाठी योग्य वाण. १६० ते १७० दिवसात तयार होणारा वाण. हेक्टरी उत्पादकता १८ ते २० क्विंटल.
बी.एस.एम.आर.७३६:
मध्यम आकाराचे तांबडे दाणे, मर व वांझ रोगास प्रतिकारक, सलग व आंतरपीक पद्धतीसाठी योग्य वाण. १७० ते १८० कलावधीत तयार होणारे वाण. उत्पादकता १६ ते १८क्विंटल.
लागवडीचा हंगाम आणि लागवड :
पेरणीची वेळ:
तुरीची पेरणी वेळेवर होणे आवश्यक आहे. तुरीची पेरणी जूनच्या दुसऱ्या आठवड्यात करावी. पेरणी जसजशी उशिरा होईल तसतसे उत्पादन घटत जाते. यासाठी १० जुलै तूर पिकाची पेरणी करून घ्यावी.
बियाणे प्रमाण:
आय.सी.पी.एल.-८७ च्या पेरणीसाठी हेक्टरी १८ ते २० किलो.मध्यम मुदतीच्या राजेश्वरी, विपुला व ए.के.टी. ८८११ वाणासाठी हेक्टरी १२ ते १५ किलो.तुरीची रोपान्द्वारे लागवड करावयाची झाल्यास वरील शिफाराशीच्या निम्मे बियाणे लागते.
पेरणीचे अंतर:
अति लवकर तयार होणारे वाण ४५ x १० सें.मी. लवकर तयार होणारे वाण ६० x २० सें.मी. व आशादायक उत्पादनासाठी १८० x ३० सें.मी. किंवा ९० x ६० सें.मी.
बीजप्रक्रिया:
पेरणीपूर्वी प्रति किलो बियाण्यास २ ग्रँ. थायरम + २ ग्रम कार्बेडँझीम किंवा ५ ते १० ग्रँ. ट्रायकोडर्मा प्रति किलो बियाण्यास चोळावे. यानंतर प्रत्येकी २५० ग्रँ. रायझोबियम अधिक पी.एस.बी. १० किलो बियाण्यास गुळाच्या थंड द्रावणातून चोळावे.
खत व्यवस्थापन:
सलग तुरी साठी हेक्टरी २५ किलो नत्र व ५० किलो स्फुरद म्हणजेच १२५ किलो डि.ए.पी. पेरणीचे वेळी द्यावे.
पाणी व्यवस्थापन:
तूर खरीप हंगामातील पिक असल्याने पावसावर वाढते. पण पावसात खंड पडल्यास आणि सिंचनाची सुविधा उपलब्ध असल्यास पुनर्लागवडीनंतर लगेचच ३० ते ३५ दिवसांनी कळी अवस्थेत आणि ६० ते ७० दिवसांनी शेंगा भरण्याच्या अवस्थेमध्ये पाणी द्यावे.तसेच हंगामात पावसाचा मोठा ताण पडल्यास १३:००:४५ ५० ग्रँ. १० लिटर १० दिवसाच्या अंतराने दोनदा फवारावे किंवा २ % युरिया /डी.ए.पी. ची फवारणी करावी.
आंतरमशागत :
पिकात १५ ते २० दिवसांनी कोळपणी व पुढे १५ दिवसांनी खुरपणी किंवा कोळपणी करावी. अधिक उत्पादनासाठी पिक पेरणीनंतर ४५ ते ६० दिवस शेत तणविरहित ठेवावे.
तण नियंत्रण:
तुरीचे पिक पावसाळ्यात घेतले जात असल्यामुळे त्यात वेगवेगळ्या तणांचा प्रादुर्भाव होत असतो. सुरुवातीच्या काळात तूर ३० ते ४५ दिवस सावकाश वाढते. यामुळे सुरुवातीच्या कातळ तणांचा प्रादुर्भाव जाणवतो.
तुरीचे पिक पेरणीपासून ४५ दिवसापर्यंत तण विरहित ठेवल्यास तुरीच्या उत्पादनात लक्षणीय वाढ होते. त्यासाठी पिक १५ ते २० दिवसांचे असताना पहिली व ३० ते ४५ दिवसांचे असताना दुसरी खुरपणी करावी.
रासायनिक तण नियंत्रण:
तूर पिकतील रुंद पानाची वार्षिक व गवतर्गीय तणाच्या नियंत्रणासाठी अँलाक्लोर ५०% इ.सी.(लासो) ८० ते १०० मि.ली. प्रति १० लिटर पाण्यातून पिक पेरणीनंतर पण पिक व तणे उगवण्यापूर्वी फवारावे किंवा पेंडीमेथँलीन ३० % इ.सी. ७० ते १०० ग्रॅम पिक पेरणीनंतर पण पिक व तणे उगवण्यापूर्वी किंवा क्युझालोफाँप इथाईल ५ % इसी (टरगा सुपर) १५ ते २० मिली पेरणीनंतर २० ते २५ दिवसांनी यापैकी एक तण नाशकाची फवारणी फ्लड जेट नोजल चा वापर करून जमिनीत ओलावा असताना फवारणी करावी.
आंतरपिक :
महाराष्ट्रात तूर पिकामध्ये खालीलप्रमाणे आंतरपिके घेण्याची शिफारस करण्यात आलेली आहे. बाजरी + तूर (२:१), तूर + सूर्यफूल (१:२) सोयाबीन + तूर (४:२) तूर + ज्वारी (१:२) किंवा (१:४) तूर + कापूस (१:६) किंवा (१:८) तूर + भुईमुग (१:३) तूर + मुग (१:३) तूर + उडीद (१:३)

किडींची ओळख आणि नियंत्रण:
तुरीवरील किडींचे एकात्मिक नियंत्रण :-
तुरीवर प्रामुख्याने हेलिकोव्हर्पा, शेंगमाशी, पिसारी पतंग या किडींच्या प्रादुर्भावाने पीक उत्पादनात घट येते. हे लक्षात घेऊन एकात्मिक पद्धतीने कीड नियंत्रणाच्या उपाययोजना कराव्यात.
एकात्मिक नियंत्रणाच्या उपाययोजना –
उन्हाळ्यात जमिनीची नांगरणी केल्यामुळे किडींचे कोष पक्षी वेचून खातात, तीव्र उन्हामुळे कोष मरतात.कीड प्रतिबंधक जातींचा वापर आर्थिक नुकसान कमी करण्यास मदत करतो.शेतात दर हेक्टरी २० पक्षी स्थानके उभारल्यामुळे अळ्यांची संख्या कमी होण्यास मदत होते.तुरीसोबत ज्वारी, बाजरी, मका, मूग व सोयाबीन आंतरपीक म्हणून घेणे फायदेशीर ठरते. हेलिकोव्हर्पा अळीचा प्रादुर्भाव जास्त झाल्यास तुरीचे झाड थोडेसे वाकडे करून हळुवार हलवून अळ्या पाडून नष्ट कराव्यात.
आर्थिक नुकसानीच्या पातळी –
लिंगाकर्षक सापळ्यात हेलिकोव्हर्पा नर पतंगांची संख्या सतत तीन दिवस प्रती सापळा ८-१० पेक्षा जास्त. हेलिकोव्हर्पा अळीच्या १-२ अळ्या प्रती झाड. पिसारी पतंगाची १ अळी प्रती २ झाडे. किंवा ५ % प्रादुर्भावग्रस्त शेंगा आढळून आल्यास.
वनस्पतीजन्य किटकनाशके –
सुरवातीच्या काळात ५ टक्के निंबोळी अर्काची १० दिवसाच्या अंतराने २-३ फवारण्या कराव्यात.
जैविक नियंत्रण –
तुरीवरील शेंगा पोखरणाऱ्या अळीच्या प्रभावी व्यवस्थापनाकरिता प्रती हेक्टर एच.एन.पी.व्ही. (HaNPV) ५०० रोगग्रस्त अळ्यांचा अर्क (१x१०-९ तीव्रता) फवारावा. विषाणूच्या फवाऱ्याची कार्यक्षमता अति-नील किरणात टिकविण्यासाठी अर्धा लिटर पाण्यात ५० ग्रॅम नीळ मिसळून हे द्रावण एक मि.लि. प्रती लिटरप्रमाणे अर्कात मिसळून फवारणी करावी.फवारणी शेतात प्रथम व द्वितीय अवस्थेतील अळ्या असताना केल्यास अतिशय प्रभावी ठरते.
रासायनिक किटकनाशकांचा वापर –
तुरीवरील शेंगा पोखरणाऱ्या अळ्यांच्या प्रभावी व्यवस्थापनासाठी किडींनी आर्थिक नुकसानीची संकेत पातळी गाठल्यानंतर रेनाक्सीपार (कोराजन) २०% एस.सी. २.५ मि.लि. किंवा इमामेक्टीन बेंझोएट (५ टक्के) ३ ग्रॅम प्रति १० लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी.

रोगांची ओळख आणि नियंत्रण :
तुरीवरील मर रोग:
या रोगाचा प्रादुर्भाव झाल्यानंतर प्रथम झाडांची शेंड्याकडील पाने कोमेजू लागतात. कालांतराने पाने पिवळी पडतात, जमिनीकडे वळू लागतात, वाळतात. पाने गळून नंतर शेवटी फक्त तूरकाठीच राहते. काही झाडांवर जमिनीपासून ते खोडापर्यंत काही फुटांपर्यंत तपकिरी व नंतर काळा होत जाणारा पट्टा स्पष्ट दिसतो. मुळावर काळे डाग पडल्याचे आढळून येते. खोडाचा उभा छेद घेतल्यास त्याचा मधला भाग संपूर्ण तपकिरी काळा पडल्याचे आढळून येते. हेच या रोगाचे मुख्य लक्षण आहे. शेतात एखाद्या-दुसऱ्या झाडावर रोगाचा प्रारंभ होतो. यानंतर त्या झाडाभोवतीची झाडे रोगग्रस्त होतात, तसेच शेतात ठिकठिकाणी रोगाची लागण झालेली दिसून येते. काही झाडांवर एकाच फांदीवर रोगाची लक्षणे दिसून येतात.
नियंत्रणाचे उपाय:
पेरणीसाठी प्रतिकारक्षम वाणांची निवड करावी.(उदा. फुले राजेश्वरी, बी.डी.एन.-१व २, बी.एस.एम.आर.- ७३६, बी.एस.एम.आर. – ८५३ व आय.सी.पी.एल. – ८७). उन्हाळ्यामध्ये शेताची खोल नांगरट करावी व जमीन चांगली तापू द्यावी त्यामुळे मातीतील बुरशी उष्ण तापमानामुळे नष्ट होते. फेरपालटाची पिके घ्यावीत.ज्वारी, बाजरी किंवा मका या तृणधान्याचा तुरीमध्ये आंतरपीक म्हणून समावेश करावा.
जमिनीतील मर रोगाची बुरशी कमी होण्यासाठी वर्षानुवर्षे कडधान्य घेण्याऐवजी कडधान्यानंतर तृणधान्य वर्गातील पिके घ्यावीत. उदा. ज्वारी, मका, बाजरी इत्यादी. पेरणीपूर्वी बियाण्यास बेनलेट + थायरम या बुरशीनाशकाची १:१ या प्रमाणात तीन ग्रॅम प्रति किलो बियाण्यास प्रक्रिया करावी किंवा बियाण्यास ट्रायकोडर्मा या परोपजीवी बुरशीनाशकाची ५ ते १० ग्रॅम प्रति किलो या प्रमाणात बीजप्रक्रिया करावी.
२) वांझ रोग –
रोगाचा प्रादुर्भाव रोपावस्थेपासून ते पीक पक्व होण्यापर्यंतच्या काळात केव्हाही आढळून येतो. रोपावस्थेत झाडाच्या पानावर प्रथम पिवळे चट्टे पडतात. अशी पाने आकाराने लहान राहतात व कालांतराने आकसतात. पाने पिवळी पडतात अशा झाडाच्या दोन पेऱ्यांतील अंतर कमी होते. त्यांना अनेक फुटवे फुटतात व झाडांची वाढ खुंटते. त्यांना फुले किंवा शेंगा येत नाहीत किंवा फार थोडी फुले व शेंगा येतात.
बऱ्याच वेळा काही फांद्यांवरच रोगाचा प्रादुर्भाव झाल्याचे दिसून येते.या रोगाचा प्रसार सूक्ष्म विषाणूमार्फत होतो. हे विषाणू कोळी कीटकामार्फत पसरविले जातात. रोग प्रसारक कोळी वाऱ्याच्या साह्याने रोगग्रस्त झाडापासून निरोगी झाडावर राहून नेले जातात व तेथे विषाणूचा प्रसार करतात.
नियंत्रणाचे उपाय:-
पेरणीसाठी प्रतिकारक्षम वाणांची निवड करावी. (उदा. फुले राजेश्वरी, विपुला, बी.डी.एन-७११, बी.एस.एम.आर. -७३६, बीएसएमआर – ८५३, आयसीपीएल -८७) पेरणीपूर्वी शेतात आपोआप उगवलेली बांधावरील तसेच बहुवर्षीय तुरीची झाडे उपटून टाकावीत.शेतात वेळोवेळी निदर्शनात आलेली वांझ रोगग्रस्त झाडे उपटून नष्ट करावीत.कोळी किडीच्या नियंत्रणासाठी १० मि.लि केलथेन किंवा मेटासिस्टॉक्स किंवा डायमेथोएट प्रति १०लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी.

काढणी आणि हाताळणी :
तुरीची काढणी :
तुरीची कापणी जातीपरत्वे करावी लागते. तुरीची काढणी ४ महिन्यापासून ते १० महिन्यांपर्यंत करावी लागते. जून मध्ये लागवड केलेल्या तुरीच्या वाणांची काढणी नोव्हेंबर डिसेंबर आणि उशिरा पक्व होणाऱ्या वाणांची काढणी मार्च ते एप्रिल महिन्यांपर्यंत करावी. तुरीच्या झाडांची कापणी विळ्याच्या सहाय्याने करावी.
तुरीची मळणी:
तुरीची काढणी केल्यानंतर एक आठवड्यापर्यंत तुरीची झाडे उन्हात वाळू घालावेत. त्यानंतर काठीच्या सहाय्याने झोडून तुरीच्या शेंगा वेगळ्या केल्या जातात. या शेंगा बैलांच्या पायाखाली तुडवून किंवा मळणी मशीन मध्ये घालून मळणी करावी. त्यानंतर धान्याची साफसफाई करून २-३ दिवस स्वच्छ सूर्यप्रकाशात वाळवून जेव्हा ८-१० % ओलावा राहील अशा वेळी साठून ठेवा.
उत्पादन:
बागायती भागात वाणानुसार २० ते २५ क्विंटल प्रति हेक्टर तर कोरडवाहू भागात तुरीचे १२ ते १५ क्विंटल प्रति हेक्टर उत्पादन मिळते. तुरीच्या धन्या एवढेच भुस्स्याचे उत्पादन येते परंतु भुस्स्याचे उत्पादन धन्यापेक्षा २.५ ते ३ पट जास्त मिळते.

साठवण :
साठवणीपुर्वी तूर धान्य ५-६ दिवस चांगले उन्हात वाळवून पोत्यात किंवा कोठीत साठवावे. साठवण कोंदट व ओलसर जागेत करू नये. शक्य असल्यास कडू लिंबाचा पाला (५ %) धान्यात मिसळून धान्य साठवावे. यामुळे धान्य साठवणीतील किडीपासून सुरक्षित राहते.
लेखन: श्री. नारायण निबे, मो. 8805985205 विषय विशेषज्ञ (कृषि विद्या)
डॉ. श्याम सुंदर कौशिक, वरिस्ट शाश्रज्ञ व प्रमुख
कृषि विज्ञान केंद्र, दहिगाव – ने अहमदनगर