पोळ/ खरीप कांदा रोपवाटिका व्यवस्थापन

Horticulture

पोळ/ खरीप कांदा रोपवाटिका व्यवस्थापन
जाती – फुले समर्थ, बसवंत ७८०, अग्रीफाउंड डार्क रेड, एन ५३, अरका कल्याण, भिमा सुपर.
रोपवाटीकेसाठी जागा – रोपवाटिका नेहमी स्वच्छ सूर्यप्रकाश मिळेल अशा जागी असावी. जागा शक्यतो विहिरीजवळ असावी म्हणजे वेळच्या वेळी पाणी देणे सोपे होईल. लव्हाळा किंवा हरळी यासारखे गवत असणारी तसेच पाणी साचणारी सखल भागाची जमीन रोपवाटीकेसाठी टाळावी.

वाफे तयार करणे – रोपे गादी वाफ्यावर तयार करावीत. गादीवाफे १ मी. रुंद, ३-४ मी. लांब व उंची १५ सें.मी. ठेवावी. गादी वाफे नेहमी उताराला आडवे तयार करावेत. एक हेक्टर कांदा लागवडीसाठी १० ते १२ गुंठे जमीन रोपवाटिका करण्यासाठी लागते.
खते – वाफे तयार करताना प्रती वाफा २ घमेले शेणखत, ३०० ग्रॅ. सुफला (१५:१५:१५), ५० ग्रॅ. कॉपर ऑक्सीक्लोराइड टाकून वाफे चांगले घोळून घ्यावेत.
बीजप्रक्रिया – पेरणीपुर्वी प्रति किलो बियाण्यास २ ग्रॅ. कार्बेन्डेझिम/ थायरम/ कॅप्टनची प्रक्रिया करावी.
पेरणी – बियांची उगवणक्षमता चांगली असेल तर एक हेक्टर लागवडीसाठी ६ ते ७ किलो बियाणे पुरेसे होते. साधारणपणे प्रत्येक चौरस मीटरवर १ ग्रॅ. बी पेरावे, म्हणजे एका वाफ्यावर ३० ग्रॅ. बी पेरावे. दोन सें.मी. खोल रुंदीस समांतर रेषा ओढून बी पानक प्रमाणे पेरावे व मातीने झाकावे.
तण व्यवस्थापन – रोपवाटीकेतील तण नियंत्रणासाठी पेरणीनंतर वाफ्यावर पेंडीमीथॅलीन २ मिली/लि. पाण्यात मिसळून फवारणी करावी. तणनाशक फवारणीनंतर लगेच पाणी द्यावे. तण उगवणिपूर्वीचे तण नाशक फवारले नसल्यास आक्झिफ्लोरफेन ०.७५ मिली/लि. व क्युझोल्फाप इथाईल १ मिली/लि. पाण्यात मिसळून पेरणीनंतर २५ दिवसांनी फवारणी करावी.
पाणी व्यवस्थापन – क्षेत्र जास्त असल्यास व झारीने पाणी देणे शक्य नसल्यास पाण्याचा प्रवाह कमी ठेवावा व वाफ्याच्या तोंडाशी गवताची पेंढी ठेवावी. त्यानंतर पाणी बेताने ७-८ दिवसांच्या अंतराने घ्यावे.
रोपे निरोगी राहण्यासाठी रोपर उगवून आल्यानंतर प्रत्येक वाफ्यात ५० ग्रॅ. युरिया ५ ग्रॅ. फोरेट रोपांच्या दोन ओळीमधून द्यावे आणि बुरशी नाशक व कीटक नाशकांच्या १० ते १५ दिवसाच्या अंतराने फवारण्य कराव्यात. साधारणत: ६ ते ८ आठवड्यांचे रोप लागवडीस योग्य असते.