जमिन आरोग्य तपासणी काळाची गरज :-श्री. नारायण निबे

जमिन आरोग्य तपासणी काळाची गरज :

कृषिप्रधान भारत देशात ६५ टक्के लोक शेती व शेतीपूरक व्यवसाय करतात. देशाचा विकास शेतकरी व ग्रामीण जनतेच्या आर्थिक उन्नतीवर अवलंबून आहे. नैसर्गिक साधनसंपत्ती च्या कार्यक्षम वापरातून शेतीतून उच्च प्रतीचे अधिक उत्पादन काढणे काळाची गरज आहे. त्यासाठी जमीन, पाणी आणि पिकांचे योग्य नियोजन करून त्यास आधुनिक तंत्रज्ञानाची जोड देणे फायदयाचे ठरणार आहे.


महाराष्ट्र राज्यात एकूण लागवडीखालील क्षेत्र २२४.०५ लक्ष हेक्टर असून त्यापैकी १.३ लाख हेक्टर क्षारपड झालेली आहे आणि हे क्षेत्र दिवसेंदिवस वाढतच आहे. त्यामुळे जमिनीचे आरोग्य कोणत्या न कोणत्या कारणाने बिघडत आहे. हि बाब राज्याच्या दृष्टीने चिंतेची बाब आहे. यासाठी राष्ट्रीय स्तरावर केंद्र सरकार ने राष्ट्रीय मृद आरोग्य अभियान सुरु केले आहे. या अभियानातून शेतकर्यांना जागरूक करून शाश्वत उत्पादन व पर्यावरण संतुलन कसे करावे यासबंधी माहिती देणे हा या अभियानाचा उद्देश आहे.
जमीन हि सजीव असून जमिनीची सुपीकता त्यामध्ये उपलब्ध असणाऱ्या अन्नद्रव्याच्या प्रमाणावर अवलंबून असते. जमिनीची तपासणी जमिनीचा प्रकार ठरविणे, जमिनीतील अन्नद्रव्यांची माहिती घेऊन त्यानुसार खतांची शिफारस व जमिनीमध्ये काही दोष असल्यास त्यावर उपाययोजना करण्यासाठी केली जाते.

माती परीक्षण म्हणजे काय ?
माती परीक्षण म्हणजे शेतातील प्रातिनिधिक नमुन्यांचे पृथक्करण करून त्यातील उपलब्ध मुख्य, दुय्यम व सूक्ष्म अन्नद्रव्यांचे प्रमाण तपासून अहवालानुसार पिकाचे व खतांचे नियोजन करणे होय.

१. माती परीक्षण केल्यामुळे कोणते फायदे होतात:
१. माती परीक्षण केल्यामुळे आपणास जमिनीत असलेल्या अन्नद्रव्याचे प्रमाण समजते.
२. आपली जमीन आम्लधर्मी आहे किंवा विम्लधर्मी आहे याची माहिती होते व त्यानुसार पिकांचे नियोजन करणे सोपे जाते.
३. माती परीक्षणामुळे संतुलित खतांचा वापर करणे शक्य होऊन पिक उत्पादनात वाढ होते व खतांची बचत देखील होते.
४. माती परीक्षणामुळे पिकांच्या वाढीस आवश्यक असणाऱ्या अन्नद्रव्यांचा समतोल कायम राखता येतो.
५. माती परीक्षणामुळे जमिनीची सुपीकता टिकवून उत्पादनक्षमता वाढविण्यास मदत होते.

२. माती परीक्षणासाठी मातीचा नमुना केव्हा घ्यावा?
 माती परीक्षणासाठी मातीचा नमुना साधारणतः अगोदरच्या पिकाची कापणी झाल्यावर घ्यावा.
 शक्यतो कुठलेही खत घातल्यानंतर तीन महिन्यांच्या आत नमुना घेऊ नये.
 शेतात पीक उभे असताना मातीचा नमुना पिकांच्या दोन ओळींच्या मधल्या जागेतून घ्यावा.

३. मातीचा नमुना घेण्यासाठी आवश्यक साहित्य –
मातीचा नमुना घेण्यासाठी टिकाव, फावडे, खुरपे, घमेले किंवा गिरमिट, स्वच्छ गोणपाट कापडी पिशवी इ. साहित्य आवश्यक आहे.

४. माती परीक्षणासाठी मातीचा नमुना कसा घ्यावा?
१. माती परीक्षणासाठी मातीचा नमुना घेताना जमिनीचा रंग, उंच, सखलपणा, पोत, खोली याबाबींचा विचार करावा.
२. सर्वसाधारणपणे पिकासाठी जमीन जर एकसारखी असेल तर दोन हेक्टर जमिनीतून 10 ते 12 ठिकाणचे माती नमुने घेऊन त्यातून एका मातीचा प्रातिनिधिक नमुना तयार करावा.
३. एकाच शेतात निरनिराळ्या प्रकारची जमीन असल्यास प्रत्येक प्रकाराच्या जमिनीतून एक स्वतंत्र प्रातिनिधिक नमुना घ्यावा.

५. माती परीक्षणासाठी मातीचा प्रातिनिधिक नमुना घेण्याची पद्धत –
१. माती परीक्षणासाठी मातीचा नमुना घेताना मातीच्या पृष्ठभागावरील काडीकचरा, दगड इ. हाताने बाजूला करावेत.
२. नमुना घेण्यासाठी टिकाव किंवा फावड्याने एक द्रोण आकाराचा किंवा इंग्रजी “V’ आकाराचा खड्डा करावा.
३. खड्ड्याच्या एका बाजूची 2-3 सेंमी जाडीची माती खुरप्याच्या साह्याने वरपासून खालपर्यंत खरवडून घ्यावी. अशा रीतीने शेतातील प्रत्येक विभागातून मातीचे नमुने घेऊन ते घमेल्यात एकत्र करावेत.
४. मातीतील काडीकचरा, दगड बाजूला करून ती चांगली मिसळावी व स्वच्छ गोणपाटावर घ्यावी. गोणपाटावर मातीचा ढीग करून चार समान भाग करावेत. या समान चार भागामधून समोरासमोरील दोन भाग काढून टाकावेत.
५. उरलेल्या दोन भाग पुन्हा एकत्र मिसळून त्याचे चार भाग करून परत दोन भाग काढून टाकावेत.
६. अंदाजे अर्धा किलो माती शिल्लक राहील तोपर्यंत वरील क्रिया करावी.
७. माती ओली असल्यास ती सावलीत सुक्वावी.
८. सुकविलेली माती स्वच्छ कापडी पिशवीत भरावी.

मातीचा नमुना तपासण्यासाठी आवश्यक माहिती तक्ता:
मातीचा नमुना प्रयोगशाळेत तपासणीसाठी देताना त्यासोबत शेतकऱ्यांनी स्वतःचे नाव, गाव, शेताचा सर्व्हे नं/गट नं, ठिकाण/खूण, जमिनीचा प्रकार(वाळू/पोयटा/चिकणमाती/क्षारयुक्त/ विम्ल/चुनखडीयुक्त), विहीर-आहे/नाही, शेतीचा प्रकार, जमिनीचा उतार, पाण्याचा निचरा व नमुना गोळा केल्याची तारीख इ. माहिती भरून द्यावी.

ओलिताच्या पाण्याचा पृथः कारणासाठी नमुना :
जमिनिप्रमानेच पिक उत्पादनासाठी पाणी हा एक महत्वाचा घटक असून पाण्यात अनेक प्रकारचे क्षार विरघळलेले असतात. जमिनीत जड पाण्याच्या वापरामुळे काही जमिनी मऊ तर हलक्या पाण्याच्या वापरामुळे जमिनी चोपण व घट्ट होत आहेत.
पाण्यात कमी अधिक प्रमाणात कॅल्शीयम, मग्नेशियम, सोडियम, पोत्याशियम, क्लोराईड, सल्फेट, नायट्रेट, कार्बोनेट, बायकार्बोनेट, फ्लोराइड, अर्सेनेट, मोलीब्डेट, बोरॉन हे घटक विद्राव्य स्वरुपात असतात. त्यांचे प्रकार व प्रमाण यावरून ओलीतासाठीच्या पाण्याची प्रत ठरविता येते.

ओलिताच्या पाण्याचा नमुना घेण्यासाठी लागणारे साहित्य:
१. १/२ लिटर क्षमतेची प्लास्टिक किंवा काचेची बाटली.
२. सुत किंवा नायलॉन ची दोरी.
३. पाण्याची पातळी मोजमापक.
४. रंगीत पेन्सील व लेबल.

ओलिताच्या पाण्याचा नमुना कसा घ्यावा?
१. धरण, तळे, पाट, व नदी यांच्या पाण्याचा नमुना घेतांना त्यांच्या काठाजवळचे पाणी तपासणीसाठी घेऊ नये.
२. लांब दोरी किंवा काठीच्या सहाय्याने पाण्याच्या मध्यभागातून नमुना घ्यावा.
३. विहीर व कुपनलिका यांचे पाणी घेण्यापूर्वी १० ते २० मिनिटे विद्युत पंपाच्या सहाय्याने पाण्याचा उपसा करावा व नंतरच नमुना घ्यावा.
४. वाहत्या प्रवाहातून पाण्याचा नमुना प्रवाहाच्या मध्यभागातून घ्यावा.
५. नमुन्याला ओळख चिन्ह जोडून नमुना प्रयोगशाळेत तपासणीसाठी त्वरित पाठवावा.
६. जर परीक्षण करणे शक्य नसल्यास पाण्यात ट्युलीन चे २-३ थेंब टाकावे. त्यामुळे पाण्यात जीवाणूंची वाढ होणार नाही.
७. पाण्यात माती किंवा इतर कण असतील तर पाणी व्हाटमन न. १ गाळण कागदातून गाळून घ्यावे.

अधिक माहितीसाठी संपर्क:
श्री. नारायण निबे,
प्र. वरिष्ठ शाश्त्रज्ञ तथा विषय विशेषज्ञ (कृषि विद्या)
कृषि विज्ञान केंद्र, दहिगाव-ने ता. शेवगाव
मो. ८८०५९८५२०५

(more)