बटाट्यापासून बनवा फ्रेंच फ्राइज, वेफर्स

बटाट्यापासून बनवा फ्रेंच फ्राइज, वेफर्स
भाजीपाल्याचे क्षेत्र व उत्पादन मोठ्या प्रमाणावर वाढत आहे. भाजीपाला हे नाशवंत पीक असून, त्याच्या टिकाऊपणाला मर्यादा आहेत. बाजारात आवक जास्त झाली किंवा तोडलेल्या भाजीपाल्याची लवकर विक्री न झाल्यास शेतकऱ्याचे नुकसान होते. भाजीपाल्यापासून प्रक्रियाकृत पदार्थांची निर्मिती व विक्री यामधून ग्रामीण भागात मोठ्या प्रमाणात रोजगार निर्मिती होऊ शकते.

कमी भांडवल गुंतवून लघुउद्योगाच्या स्वरूपात महाराष्ट्रात प्रमुख भाजीपाल्याचे विविध प्रक्रियांयुक्त पदार्थ निर्माण करता येतात, त्यामुळे त्यांची निर्मिती व विक्री व्यवस्थापन याबाबत माहिती मिळवणे फायदेशीर राहील.

बटाटा : बटाट्यापासून कर्बोदकेशिवाय शरीर पोषणास व आरोग्यास आवश्यक अशी प्रथिने, खनिजद्रव्ये आणि क जीवनसत्त्व भरपूर प्रमाणात मिळतात. बटाट्यापासून वेफर्स, पावडर, फ्रेंच फ्राइज, पुनर्निर्मित वेफर्स व चकली इत्यादी पदार्थ तयार केले जातात.

वेफर्स : बटाटे स्वच्छ पाण्यात धुऊन त्यांची साल काढून १ मि.मि. जाडीच्या चकत्या कराव्यात. त्या ५ टक्के मिठाच्या द्रावणात ५ मिनिटे ठेवाव्यात. मग त्यास १०० सें.ग्रे. तापमान असलेल्या गरम पाण्याची १ मिनिटे प्रक्रिया करावी. चकत्या ०.२५ टक्के कॅल्शियम क्लोरोइडच्या द्रावणात बुडवाव्यात. त्यानंतर त्या तेलात तळल्यावर वेफर्स तयार होतात. त्या प्लॅस्टिक पिशवीत घालून बंद कराव्यात व विकाव्यात.

पावडर : बटाटे स्वच्छ पाण्याने धुऊन त्यांची साल काढून शिजवून घ्यावेत. शिजविलेल्या बटाट्याचा लगदा करून ड्रायरमध्ये वाळवून पावडर तयार होते. संशोधनाद्वारे असे दिसून आले, की जर बटाट्याची पावडर २ ते ३ टक्क्यांपर्यंत बेकरी पदार्थात वापरली, तर बेकरी पदार्थ जास्त दिवस ताज्या स्थितीत राहू शकतात.

फ्रेंच फ्राइज : चांगल्या प्रतीचे बटाटे स्वच्छ पाण्याने धुऊन त्यांची साल काढावी. चाकूने बटाट्याचे तुकडे करून त्यांच्यावर गरम पाण्याचा प्रक्रिया करतात. त्यानंतर ते तेलात तळतात व पॅकिंग करून अतिशय थंड तापमानात साठवितात. फ्रेंच फ्राईजला मोठ्या मोठ्या, हॉटेल्समध्ये भरपूर प्रमाणात मागणी असते.

पुनर्निर्मित वेफर्स : चांगल्या प्रतीचे बटाटे स्वच्छ पाण्यात धुऊन घ्यावेत. नंतर त्यांना शिजवून त्याचा लगदा तयार करावा. त्यात चवीप्रमाणे मसाल्याचे पदार्थ, थोडे मक्याचे पीठ घालून त्याचे एकजीव मित्रण बनवावे. एकजीव मिश्रणाचे वेफर्सच्या आकाराचे तुकडे करून घ्यावेत. पाण्याचे प्रमाण १२ टक्क्यांपर्यंत येईपर्यंत ते वाळवून घ्यावेत. नंतर तेलात तलावेत व प्लॅस्टिक पिशवीत पॅक करून विकावेत.

चकली : संपूर्ण बटाट्याच्या पिठात १० ते २० टक्क्यांपर्यंत शेंगदाण्याच्या कुटाचा वापर करून हा पदार्थ तयार करतात. याकरिता पिठात पाणी व मिरची पावडर टाकावी. या मिश्रणाला किचन प्रेसचा वापर करून दाब द्यावा म्हणजे चकली तयार होईल. या चकल्या उन्हात वाळवून तेलात तळाव्यात. चकल्या खाण्यास स्वादिष्ठ व खुसखुशीत लागतात.

(more)