खरीप पूर्व पिकांचे नियोजन काळाची गरज – शास्त्रज्ञ के.वि.के. दहिगाव-ने.

General Awareness

खरीप पूर्व पिकांचे नियोजन काळाची गरज – शास्त्रज्ञ के.वि.के. दहिगाव-ने.
खरीप पूर्व पिकांचे नियोजन करणे हि काळाची गरज असून त्यासाठी खरीप हंगामातील पिकांची पूर्व तयारी सर्व शेतकऱ्यांनी करण्याचे आवाहन कृषि विज्ञान केंद्र, दहिगाव-ने चे वरिष्ठ शास्त्रज्ञ तथा प्रमुख डॉ. श्याम सुंदर कौशिक यांनी केले.
कृषि विज्ञान केंद्र, दहिगाव-ने व मातृभूमी कृषि संवाद शेतकरी मंडळ कांबी, ता.शेवगाव यांच्या संयुक्त विद्यमाने खरीपपूर्व पिकांचे नियोजन करण्यासाठी शेतकरी शास्त्रज्ञ सुसंवादाचे आयोजन श्री. हनुमान मंदिर कांबी येथे केले गेले.
IMG-20160623-WA0003
यावेळी बोलतांना मातृभूमी कृषि गटाचे उपाध्यक्ष श्री. लहू मडके यांनी कृषि विज्ञान केंद्राचे वेळोवेळी कांबी गावातील शेतकऱ्यांना शेती नियोजनासंबंधी मार्गदर्शन करावे. अशी भूमिका मांडली. त्यास लगेच केंद्राचे प्रमुख डॉ. श्याम सुंदर कौशिक यांनी मान्यता दिली.
तूर, सोयाबीन व कपाशी पिकाचे एकात्मिक व्यवस्थापन करतांना शेतकऱ्यांनी योग्य जमीन निवडून सुधारित बियाणे व बीजप्रक्रिया करून पिकाची सुधारित पद्धतीने लागवड करण्याचे तंत्रज्ञान व एकात्मिक अन्नद्रव्य व्यवस्थापन करण्याचे आवाहन श्री. नारायण निबे – विषय विशेषज्ञ (कृषि विद्या) यांनी केले.
शेतकऱ्यांनी फक्त गळीतधान्य, कडधान्य पिके न घेता भाजीपाला किंवा फळ पिकांची लागवड करण्याचे आवाहन उद्यानविद्या विभागाचे विशेषज्ञ श्री. नंदकिशोर दहातोंडे यांनी केले.
सोयाबीन व तूर पिकातील तणांचे एकात्मिक पद्धतीने व्यवस्थापन कसे करावे याविषयी डॉ. श्याम सुंदर कौशिक, वरिष्ठ शास्त्रज्ञ तथा प्रमुख यांनी मार्गदर्शन केले.
यावेळी कांबी गावातील मोठयासंखेने प्रगतशील शेतकरी उपस्थित होते. सदर कार्यक्रमात कांबी गावात शेतकरी शास्त्रज्ञ मंचाची स्थापना करण्यात आली. त्याचप्रमाणे राष्ट्रीय अन्न सुरक्षा अभियानांतर्गत मूग पिक घेणाऱ्या शेतकऱ्यांना आय.पी.एम.-०२-०३ या जातीच्या बियाण्याचे वाटप करण्यात आले.
तसेच तज्ञांनी कृषि विज्ञान केंद्राचे कार्यक्षेत्रावर उपलब्ध असणाऱ्या विविध ऊस वाणाचे (वाण – को.-२६५, एम.एस.-१०००१, को.-८६०३२ व को.व्ही.एस.आय.-८००५) व ऊस रोपांचे उपलब्धतेबाबत मार्गदर्शन केले. केंद्राकडे ऊस रोपांची नोंदणी केल्यास आपणास ऊस रोपे उपलब्ध होऊ शकते अशी माहिती तज्ञांनी दिली.