कृषि विद्या

कृषि विद्या-
१. माती परीक्षणाचा नमुना कसा घ्यावा?


-जमिनीचा रंग, सुपीकता , खडकाळपणा व उंचसखलपणा यानुसार जमिनीचे विभाग पाडून प्रत्येक विभागात ८ ते १० ठिकाणी v आकाराचे खड्डे घेऊन बाजूचा ३ सेमी जाडीचा थर वरपासून खालपर्यंत तासून घ्यावा, सर्व माती एकत्र चांगली मिसळून अर्धा प्रातिनिधिक नुमुना तपासणी साठी पाठवावा.
२.माती परीक्षण वर्षातून कधी करावे?
-उन्हाळी हंगामातील पिकांची कापणी (काढणी) झाल्यानंतर, जमीन नांगरणीपूर्वी मातीचा नमुना घ्यावा. पिकाला रासायनिक किंवा सेंद्रिय खते दिल्यास दोन महिन्यांच्या कालावधीनंतर नमुना घ्यावा. भाजीपाला किंवा नगदी पिकांकरिता दोन वर्षांतून एकदा, तर सर्वसाधारण पिकांकरिता तीन ते चार वर्षांतून एकदा माती परीक्षण करून घ्यावे.
३.माती परीक्षणाचा नमूना कोठे घेऊ नये?
-झाडाखालची जागा, जनावरे बसण्याची जागा, पाण्याचा पाटाजवळची जागा, दलदलीची व प्राणी/वनस्पती यांचे अवशेष असलेली जागा इथे नमुना घेऊ नये
४. ऊस बेणे निवड कशी करावी?
-उसा साठी खालील जातीचे बेणे निवडावे
१) को – ७४० : तिन्ही हंगामात लागवडीस योग्य जात असून भरपूर फुटवे, साखरेचे प्रमाण मध्यम, पाण्याच्या ताणास प्रतिकारक्षम आहे. खोडव्यास उत्तम, ऊस लोळला तरी मोडत नाही, हा ऊस उशिरा पक्क होत असून सरासरी हेक्टरी १२५ टन उत्पादन मिळते.

२) को – ७२१९ (संजिवनी) : ही जात सुरू व पुर्व या दोन्हीही हंगामात लागवडीस योग्य. याचा ऊस लोळतो पण मोडत नाही. पाण्याच्या ताणास संवेदनशील असून गाळपास लवकर येते. या वाणाचे सरासरी हेक्टरी १३० टन उत्पादन मिळते.

३) को. एम. – ७१२५ (संपदा) : ही जात सुरू हंगामात लागवडीस योग्य असून ऊस लोळण्याचे प्रमाण कमी, सर्व प्रकारच्या जमिनीसाठी योग्य (संपदा) गुळासाठी चांगली व खोडव्यासाठी उत्तम आहे. मध्यम उशीरा तयार होणारी असून हेक्टरी सरासरी ११० टन उत्पादन मिळते.

४) को – ७५२७ : ही जात सुरू, हंगामासाठी योग्य असून, पक्कता दीर्घकाळ टिकते.पाण्याच्या ताणास काही प्रमाणात प्रतिकारक्षम असून पक्कता मध्यम कालावधीत होते. हेक्टरी सरासरी ११० टन उत्पादन मिळते.

५) को.एम.- ८८१२१: ही जात तिन्ही हंगामात लावण्यास योग्य असून ऊस लोळण्याचे प्रमाण कमी तसेच खोडव्यासाठी चांगली आहे. मध्यम, उशीरा काळावधीत पक्क होत असून हेक्टरी सरासरी १५५ टन उत्पादन मिळते.

६) को – ८०१४ : ही जात सुरू व पूर्व हंगामात लावता येते. खोडव्यासाठी चांगली असून सातारा, सांगली व कोल्हापूरसाठी शिफारस केली जाते. लवकर पक्क होणारी जात असून हेक्टरी सरासरी १३५ टन उत्पादन मिळते.

७) को – ८६०३२ : ही जात तिन्ही हंगामात लागवडीस योग्या जात असून ऊस लोळत नाही, गुळासाठी चांगली, पाण्याच्या ताणास प्रतिकारक्षम असून लवकर पक्क होते. हेक्टरी सरासरी १४० टन उत्पादन मिळते.

८) VSI – ४३४ : या जातीची लागवड तिन्ही हंगामात करता येते. काणी, गवताळ रोगास प्रतिकारक असून साखरेचे प्रमाण अधिक आहे. मध्यम काळावधीत पक्क होते असून हेक्टरी १५५ ते १६० टन उत्पादन मिळते.

९) फुले सावित्री – ९४०१२ : या जातीची लागवड तिन्ही हंगामात करता येते. खोडकिड, शेंडे मर, काणी, तांबेरा रोगास बळी पडत नसून साखरेचा उतारा जास्त आहे. लवकर पक्क होते असून हेक्टरी १३५ ते १४० टन उत्पादन मिळते.

१०) २६५ : ही जात ऊस संशोधन केंद्र पाडेगाव येथून विकसित केली असोन ऊस हिरवट रंगाचा जाड, उंच होतो. क्षारयुक्त जमिनीतही लागवड यशस्वी होते . पाण्याचा तन सहन करते. १७ -१८ महिने शेतात राहिला तरी दाशी पडत नाही. खोडवा चांगला येतो. फुटवे अधिक फुटतात. तिन्ही हंगामात लागवडीस योग्य असून आडसाली लागणीचा ऊस ३ ते ३।। किलो, पुर्व हंगामी २ ते २।। किलो तर सुरूचा २ किलो वजनाचा ऊस होतो. उत्पादन ८६०३२ पेक्षा २० – २५% जादा मिळते. रिकव्हरी (साखरेचा उतार) मात्र थोड कमी आहे.

५. उसावरील रोग व त्यावरील उपाय कोणते?
) चाबूक काणी : चाबूक काणी हा रोग युस्टिलॅगो सायटॅमिनी बुरशीच्या प्रादुर्भावामुळे होते. हा रोग उसाचे को – ७४० या जातीवर जास्त प्रमाणत आढळतो. ऊस पीक वाढीच्या कोणत्याही अवस्थेत हा रोग दिसून येतो. या रोगाचे मुख्य लक्षण म्हणजे रोगग्रस्त उसाचे शेंड्यातून चकचकीत चंदेरी रंगाचा चाबकाप्रमाणे निमुळता होत जाणारा पट्टा बाहेर पडतो. लवकरच पट्ट्यावरील चंदेरी आवरण फाटते व आतील काळा भाग उघडा होतो. हा काळा भाग म्हणजे बुरशीचे बीजाणू होत. हे बीजाणू हवेद्वारे विखुरतात व निरोगी उसाचे डोळ्यावर पडतात. त्यावर रोगाचा प्रादुर्भाव होतो. अशा तर्हेने रोग शेतात पसरतो. काणी रोगामुळे उसाची वाढ खुंटते, ऊस बारीक होतो, पाने अरुंद व लहान होतात, त्यामुळे उत्पादनात घट येते.लागवडीच्या उसापेक्षा खोडव्यामध्ये या रोगाचा प्रादुर्भाव जास्त प्रमाणात होतो.

या रोगाचा प्रसार बेण्याद्वारे आणि हवेद्वारे होतो.

नियंत्रणाचे उपाय :

१) रोग्रस्त उसाचा बेण्यासाठी वापर करू नये.

२) लागवडीच्या उसात काणी रोगाचा प्रादुर्भाव ५ टक्क्यापेक्षा जास्त असेल तर अशा उसाचा खोडवा घेऊ नये.

३)रोग प्रतिकारक वाणांचा वापर करावा.

४) ३ ते ४ वर्षानंतर बेणे बदलावे.

५)शेतात कणीचा पट्टा दिसताच तो प्लॅस्टिकच्या पिशवीत अलग कापून घ्यावा, संपूर्ण बेट मुळासकट उपटून काढावे व जाळून नष्ट करावे.

२) गवताळ वाढ : हा रोग मायाकोप्लाझ्मा नावाच्या विषाणूपासून होतो. याचे प्रमुख लक्षण म्हणजे उसाचे बुंध्याकडील बाजूस असलेल्या डोळ्यातून असंख्य फुटवे येतात व त्याला गवताच्या थेंबाचे स्वरूप येते. फुटवे रंगाने पिवळसर पांढरट असून त्याची पाने अरुंद व लहान असतात. हा रोग बेण्याद्वारे, ऊस कापणीच्या कोयत्याद्वारे आणि मावा किडीद्वारे पसरतो.

नियंत्रणाचे उपाय :

१) लागवडीसाठी नोरीगी बेण्याचा वापर करावा.

२) उष्णजल किंवा बाष्पउष्ण हवा प्रक्रिया देऊन तयार केलेल्या बेणे मळ्यातील बेणे नवीन लागवडीसाठी वापरावे.

३) रोगट उसाचा खोडवा ठेवू नये.

४) मावा किडीद्वारे ठेवू नये.

५) मावा किडीद्वारे या रोगाचा प्रसार होत असल्यामुळे मावा किडीचे किटकनाशकाद्वारे नियंत्रण करावे.

६) रोगप्रतिबंधक वाणांची निवड करावी.

७) शेतातील रोगग्रस्त बेटे मुळासकट काढून नष्ट करावीत.
३) गाभा रंगणे : गाभा रंगणे हा रोग कोलिटोट्रायकम फालकॅटम या बुरशीचे प्रादुर्भावामुळे होतो. सुरुवातीच्या अवस्थेत हा रोग ओळखता येत नाही, परंतु पावसाळयानंतर जेव्हा उसाची वाढ थांबून साखर तयार होण्याचे प्रक्रियेस सुरुवात होते तेव्हा या रोगाची लक्षणे दिसून येतात. रोगग्रस्त उसाचे शेंड्यापासून तिसरे अथवा चवथे पान निस्तेज पडून वाळते व नंतर पूर्ण शेंडा वाळतो. रोगग्रस्त ऊस लांबीतून उभा कापला असता आतील गाभा लाल झालेला आढळून येतो. त्यात अधून – मधून आडवे पांढरे पट्टे दिसतात. कालांतराने ऊस पोकळ होतो, आकसतो व सालीवर सुरकुत्या पडतात. अशा उसाला अल्कोहोलसारखा वास येतो. या रोगाचा प्रसार बेण्याद्वारे होतो.

नियंत्रणाचे उपाय :

१) लागवडीसाठी निरोगी बेण्याचा वापर करावा.

२) उष्णजल किंवा बाष्पयुक्त हवा प्रक्रिया देऊन तयार केलेल्या बेणे मळ्यातील बेणे नवीन लागवडीसाठी वापरावे.

३) लागवडीपूर्वी उसाचे बेणे कार्बेन्डिझम १०० ग्रॅम बुरशीनाशक १०० लिटर पाण्यात मिसळून त्या द्रावणात १० ते १५ मिनिटे बुडवून लागवड करावी.

४) ऊस कापण्याचा कोयतासुद्धा निर्जंतूक करून घ्यावा.

५) रोग्रस्त शेतातील उसाचा कापणी शक्य तेवढ्या लवकर करवी. रोगग्रस्त उसाचा खोडवा घेऊ नये.

६) ऊस कापणीनंतर त्या शेतात नवीन ऊस लागवड करू नये. पिकाची फेरपालट करवी.

७) कापणीनंतर शेतातील पाचाट, वाळा, धसकटे इत्यादी जागेवरच जाळून नष्ट करवीत.

४)उसावरील मर : हा रोग फ्युजेरियम मोनिलीफॅरमी व सेफॅलोस्पोरीयम सॅफॅरी या बुरशीमुळे होतो. या रोगाचा प्रादुर्भाव देठ कुजव्या किंवा मुळे पोखरणार्‍या अळीच्या संयोगाने मोठ्या प्रमाणात होतो. रोगाचा प्रादुर्भाव झालेल्या उसाची पाने पिवळसर व निस्तेज होतात आणि नंतर वळतात . शेवटी प्रादुर्भाव वाढल्यास ऊस पुर्णपणे वाळतो, पोकळ होतो व वजनाला हलका भरतो. मुळ्य कुजतात, ऊस अलगपणे उपटून येतो. ऊस कांड्याचे समान दोन भाग केलेल्या कांड्याचा आतील भाग करड्या रंगाचा व लालसर पडलेला दिसतो आणि बराचसा भाग तंतुमय झालेला दिसतो.

नियंत्रणाचे उपाय :

लागवडीपूर्वी जर्मिनेटर सोबत प्रोटेक्टंट ५०० ग्रॅम किंवा कार्बेन्डिझम बुरशीनाशक १०० ग्रॅम १०० लिटर पाण्यात मिसळून त्यात १० ते १५ मिनिटे ऊस बेने २ बुडवून लागवड करावी.

१) निरोगी बेणे वापरावे.

२) रोगट उसाच खोडवा ठेवू नये.

३) मुळे पोखरणार्‍या किडीचा बंदोबस्त करावा.

४) फेरपालटीची पिके घ्यावीत.

५) प्रादुर्भाव झालेल्या शेतातील बेणे वापरू नये.

६) रोगट उसाचे अवशेष गोळा करून त्यांचा नायनाट करवा.

५) पोक्का बोईंग (पोंगा कुजणे):

हा रोग फ्युजेरियम मोनिलीफॉरमी या बुरशीपासून होतो. पोक्का बोईंग याचा अर्थ शेंड्याजवळील पानाचा आकार बदलणे किंवा पोंगा कुजणे असा होतो. अलिकडे या रोगाची लागण महाराष्ट्रात दिसून आली आहे. पोक्का बोईंग रोगाची लक्षणे सर्वप्रथम पोंग्याजवळील पानावर दिसतात. सुरुवातीला देठाजवळ पाने पिवळी पडतात. रोगाची तीव्रता वाढल्यास पानावर सुरकुत्या पडतात. पाने अंकुचित होतात आणि शेंडा व पोंगा कुजतो. उसाची वाढ खुंटते, कांड्या आखूड होतात. काही वेळेस फांद्याही फुटातात. उसाची पाने एकमेकात गुंतलेली असतात.

या रोगाचा प्रसार हवेद्वारे होतो.

नियंत्रनाचे उपाय :

१) २० ग्रॅम कॉपर ऑक्सिक्लोराईड किंवा २० ग्रॅम मॅन्कोझेब अथवा १० ग्रॅम कार्बेन्डिझम यापैकी कोणतेही एक बुरशीनाशक १० लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी.

२) उशीर म्हणजे एप्रिल – मी मध्ये उसाची लागवड करू नये.

६) पायनापल अथवा अननस रोग : हा बुरशीमुळे होणारा रोग आहे. सेरॅटोसिस्टिम पॅराडॉंक्सा या बुरशीमुले उसावर हा रोग होतो. हा रोग प्रामुख्याने जमिनीद्वारे पसरतो. म्हणून ऊस लागवड झाल्यानंतर याचा प्रादुर्भाव आढळून येतो. क्वचितच जर उंदीरामुळे, किडीमुळे अथवा अवजारामुळे असास इजा झाली असेल तर ह्या रोगाचा प्रादुर्भाव उभ्या उसावर दिसून येतो. रोगजंतू इजा झालेल्या भागांवर शिरकाव करून उभ्या उसावर रोगाचा प्रादुर्भाव झाल्यास रोगग्रस्त बेणे उगवत नाही. कारण रोगजंतू कांडीतील अन्नांश स्वत:साठी उपयोगात आणतात. त्यामुळे उगवणीवर विपरीत परिणाम होतो. प्रादुर्भाव झालेल्या ऊसाकांडीचे निरीक्षण केले असता कांडी वजनाला हलकी व करड्या रंगाची होऊन कुजलेल्या अवस्थेत दिसते. कांडीचे उभे दोन भाग केल्यास आतील भाग गडद लाल ते काळ्या रागाचा झालेला दिसतो. आतील तंतुमय भाग मोकळा होऊन कांडी पोकळ होते. कांडीवरील डोळे कुजतात. त्यामुळे उसाची उगवण होन नाही आणि उगवण झाली तर ते रोप जास्त काळ जगत नाही. उगवलेल्या उसात रोगाची तीव्रता वाढल्यास प्रथम पाने वाळतात व नंतर संपूर्ण रोप वळते. रोगट उसाचे कांड्याचा वास अननस फळाच्या वासासारखा येतो. म्हणून याला ‘अननस रोग’ म्हणतात. हा रोग मुख्यत्वेकरून खोलवर लागण केल्यास किंवा पाण्याचा निचरा होत नसलेल्या जमिनीत ऊस लागण केल्यास आढळतो.

नियंत्रणाचे उपाय :

१) निरोगी बेणे वापरावे.

२) लागवडीपूर्वी बेणे १०० ग्रॅम कार्बेन्डिझम बुरशीनाशक अथवा १०० ग्रॅम बेलेटॉंन बुरशीनाशक १०० लिटर पाण्यात मिसळून या द्रावणात १० मिनिटे बुडवून लागवड करावी.

३) उसाची खोल लागवड करू नये.

४) जमीन निचरायुक्त असावी.

७) केवडा : उसावरील केवडा हा रोग लोह या अन्नद्रव्याचे कमततेमुळे दिसून येतो. गावठाण किंवा पांढरीच्या जमिनीत तसेच पोयट्याच्या जमिनीत याचा प्रादुर्भाव प्रामुख्याने आढळतो. कारण अशा जमिनीत कॅल्शियम व मॅग्नेशियमयुक्त क्षाराचे प्रमाण अधिक असल्यामुळे लोह या अन्नद्रव्याची उपलब्धता कमी असते. त्यामुळे उसावर केवडा रोग दिसून येतो. रोगाचे सुरुवातीला उसाच्या शेंड्याकडील पाने पिवळी पडू लागतात. प्रथम पानाच्या शिराकडील भाग पिवळा पडतो. नंतर शिरांचा हिरवेपणा नष्ट होऊन संपूर्ण पान पिवळे होते. पीक निस्तेज दिसू लागते. प्रादुर्भाव तीव्र स्वरूपाचा असल्याने पाने पूर्णपणे पांढरट होतात आणि केवड्याच्या पानाप्रमाणे दिसू लागतात. रोगग्रस्त उसाची उंची कमी असते. खोडव्यामध्ये सुरूवातीपासून याचा प्रादुर्भाव होऊ शकतो.

नियंत्रणाचे उपाय :

१) हिरवळीची पिके घ्यावीत.

२) गंधकयुक्त खताचा वापर करवा.

३) चुनखडीयुक्त जमिनीत उसाची लागवड करू नये.

ऊस लागवडी साठी जमीन कशी असावी?
-भारी अथवा मध्यम मगदुराच्या गाळाच्या व चांगल्या निचर्‍याच्या जमिनी या पिकास योग्य असतात. एक मीटर खोल असलेली भारी जमिनी आणि त्याखाली मुरमासारखा पाण्याचा चांगला निचरा होऊ देणार्‍या पदार्थांचा थर आणि जमिनीचा सामू ६.५ ते ८.५ असेल तर ती जमीन उसासाठी उत्तम असते.

उसामध्ये कोणती आंतरपिके घेता येतात?
– साधारणपणे सुरू हंगामातील (डिसेंबर ते फेब्रुवारी) उसामध्ये उन्हाळी भुईमूग, मेथी, कोथिंबीर, पालक, शेपू अशी पीक येतात . तर पुर्व हंगामी (सप्टेंबर ते नोव्हेंबर) उसामध्ये हरभरा, गहू, लसून, गोट कांदे ही पिके घेता येतात. आडसालीमध्ये उडीद, मूग, चवळी, मटकी, हुलगा ही कडधान्य पीके घेत येतात. त्यामुळे या अंतरपिकांपासून उत्पन्न मिळून उसाचा लागवडीचा खर्च भरून निघतो.

तसेच या आंतरपिकाचा हिरवळीच्या खतासाठीही उपयोग करता येती. त्यासाठी प्रामुख्याने खरीपामध्ये उडीद, मूग, चवळी, मटकी, हुलगा, रब्बीमध्ये हरभरा, गहू, सातू, जवस, उन्हाळ्यामध्ये भुईमूग व पालेभाज्या ही पिके घेऊन दीड ते दोन फुट झाल्यावर साधारण फुलोर्‍यात येण्यापूर्वी कापून उसाच्या सरीमध्ये गाडावे. त्यामुळे खताच्या मात्रेमध्ये बचत होते आणि यामुळे उसाची वाढ होऊन कांड्यामधील अंतर वाढून वजनदार ऊस मिळतो. शिवाय पट्टा पद्धतीमुळे एकाच बेचक्यामध्ये आलेले उसाचे फुटवे एकसारखे जाड २० ते २५ कांड्यापर्यंतचे मिळतात. त्यामुळे निश्चितच उत्पन्नात (टनेजमध्ये) वाढ होते.

ऊस लागवडी आधी बेणे प्रक्रिया कशी करावी?
-बेणे लागवडी पूर्वी १०० लिटर पाणी + ३०० मिली मेलॅथीऑन + १०० ग्रॅम बाविस्टीन १० मिनिटासाठी बेणे प्रक्रिया केल्या नंतर १० किलो अॅसिटोबॅक्टर व १.२५ किलो स्फुरद विरघळणारे जीवाणू १०० लिटर पाण्यातून टीप-या बुडवून लागवड करावी.

उसाकरिता रासायनिक खते कशा प्रकारे द्यावीत?
– नत्रयुक्त खते ४ हफ्त्यात विभागून आणि स्फुरद व पालाशयुक्त खते २ समान हप्त्यात विभागून द्यावीत , खते लागणीच्या वेळी ६ ते ८ आठवड्यानी , १२ ते १६ आठवड्यानी आणि मोठ्या बांधणीचा वेळी द्यावीत.

(more)