पिक संरक्षण

पिक संरक्षण
डाळिंबा वरील तेल्या रोग कशाने होतो?
-झान्थोमोनास पुनिकी’ या अणुजीवामुळे डाळिंबा वरील तेल्या रोग होतो.

तेल्या रोग होण्यास कोणत्या गोष्टी अनुकूल आहेत?
-बागेत किंवा बागेशेजारी तेल्या रोगाचे अवशेष असणे
-पावसाळी हवामानात रोगाचा प्रादुर्भाव आणि वाढ अतिशय झपाट्याने होते. रोगाच्या वाढीसाठी साधारणत: उष्ण तापमान (२८ ते ३८ डी. से.), मध्यम ते भरपूर आर्द्रता (५० ते ९० %), अधुनमधून हलका पाऊस आणि ढगाळ हवामान अशा वातावरणात रोगाचा प्रादुर्भाव वाढतो.
-रोगग्रस्त बागेतील गुटी कलमांचा वापर
तसेच रोगकारक जीवाणु हे ५० डी. से. तपमानापर्यंत जिवंत राहू शकतात. हंगामाच्या सुरुवातीला नवीन बहार फुटल्यानंतर जोराचा मान्सुनपुर्व पाऊस झाल्यास रोगाचा प्रादुर्भाव हमखास होतो.
रोग व्यवस्थापन :

१) हलक्या ते मध्यम (४५ सेंमी. पेक्षा कमी खोली) जमिनीत डाळींबाची लागवड करावी.

२) डाळींबाची लागवड शिफारशीनुसार ४.५ ते ३.० मीटर अंतरावर करावी.

३) रोगग्रस्त भागात शक्यतो हस्त बहार घ्यावा.

४) लागवडीसाठी रोग नसलेल्या क्षेत्रातून / रोपवाटीकेतून निरोगी कलमे / रोपे आणावित.

५) बागेस ठिबक सिंचनाद्वारे पाणी द्यावे. त्याचप्रमाणे बागेत पाणी साठणार नाही, याची काळजी घ्यावी.

६) प्रत्येक झाडास तीन ते चार खोड ठेवावेत, तसेच जमिनीपासून दोन फुटापर्यंत खोडावर फांद्या ठेवू नयेत. सर्व खोडांना जमिनीपासून दोन फुटापर्यंत बोर्डो पेस्टचा लेप पावसाळी वातावरण सुरू होण्यापुर्वी लावावा.

७) तसेच छाटणीनंतर खोडावर व छाटलेल्या भागावर कॉपर ऑक्सीक्लोराईड १५ ग्रॅम + कार्बारील ६ ग्रॅम + डी. डी. व्ही.पी. ३ मिली + १ मिली स्टिकर पाण्यात मिसळून तयार झालेल्या द्रावणाचा मुलामा द्यावा.

८ ) छाटणीची व इतर औजारे निर्जंतुक करून वापरावीत. त्यासाठी १.५ % सोडियम हायपोक्लोराईड च्या द्रावणात सर्व साहित्य १० ते १५ मि. बुडवावे. नंतरच या औजारांचा वापर करावा.

९ ) रोगग्रस्त पाने, फुले, फळे आणि फांद्या गोळा करून जाळून टाकाव्यात.

१० ) छाटणीनंतर लगेच १% बोर्डो मिश्रणाची पहिली फवारणी करावी.

११) ब्लीचींग पावडर अथवा कॉपरडस्ट (४ %) १० किलो प्रती एकर प्रमाणे जमिनीवर धुरळणी करावी.

१२) दुसर्‍या फवारणीनंतर १० ते १५ दिवसांनी स्ट्रेप्टोसायक्लीन ( २५० पी. पी. एम.) + कॉपर ऑक्सीक्लोराईड ०.२५ % ची फवारणी करावी.

१३ ) तिसर्‍या फवारणीसाठी ०.५% बोर्डो मिश्रण फवारावे. चौथी फवारणी याचप्रमाणे करावी.

१४) तसेच सुक्ष्म अन्नद्रव्ये १ ग्रॅम झिंक सल्फेट + १ ग्रॅम बोरॉन प्रति पानाय्त मिसळून फवारणी करावी.

१५ ) आवश्यकतेनुसार पुढील फवारणी करावी.

कांद्यावरील फुलकिडीचे व्यवस्थापन कसे करावे?
-कांद्यामध्ये फुलकिडीची पिल्ले आणि प्रौढ कीटक पाने खरडून पानातील रस शोषून घेतात. पानांवर पांढरे ठिपके दिसतात. असंख्य ठिपके जोडले गेल्यामुळे पाने वाकडी होऊन वळतात. दिवसा वाढलेल्या तापमानामध्ये ही कीड पानाच्या बेचक्‍यात खोलवर किंवा बांधावरील गवतामध्ये लपून राहते. या किडीने केलेल्या जखमांमधून करपा रोगाच्या जंतूंचा प्रसार होतो. त्यामुळे करपा रोगाचे प्रमाण वाढते.
उपाययोजना –
पिकांची फेरपालट करावी.
शेताच्या कडेने मक्‍याच्या दोन ओळींची लागवड करावी.
लागवडीनंतर 30 दिवसांनी 65-70 टक्के आर्द्रता असताना व्हर्टिसिलियम लेकॅनी 5 ग्रॅम प्रतिलिटर या प्रमाणे 8-10 दिवसांच्या अंतराने दोन फवारण्या कराव्यात.
5 टक्के निंबाळी अर्काची फवारणी करावी.
कांद्याच्या रोपांची लागवड करण्यापूर्वी रोपप्रक्रिया करावी.
कांदा रोपे लावणीनंतर फोरेट (10 जी) हे कीडनाशक एकरी 4 किलो या प्रमाणात वाफ्यात टाकावे.
फिप्रोनिल 15 मिली किंवा सायपरमेथ्रीन (25 ई. सी.) 5 मिली किंवा प्रोफेनोफॉस (50 ई. सी.) 10 मिली लॅम्बडा सायहॅलोथ्रीन (5 ई.सी.) 5 मिली 10 लिटर पाण्यातून आलटून पालटून फवारणी करावी.