उद्यानविद्या

उद्यानविद्या-वारंवार विचारले जाणारे प्रश्न
डाळिंब लागवडी साठी योग्य जात कोणती ?
गणेश – सध्‍या लागवडीखाली असलेले बहुतांश क्षेत्र हे या वाणाखाली असून हा वाण गणेशखिंड, फळसंशोधन केंद्र, पुणे या ठिकाणी डॉ. जी.एस.चीमा यांच्‍या प्रयत्‍नाने शोधून काढण्‍यात आलेला आहे. या वाणाचे वैशिष्‍टय असे की, बिया मऊ असून दाण्‍याचा रंग फिक्‍कट गुलाबी असतो फळात साखरेचे प्रमाणही चांगले आहे. व या वाणापासून उत्‍पादन चांगले मिळते.
मस्‍कत – या जातीच्‍या फळाचा आकार मोठा असतो. फळांची साल फिक्‍कट हिरवी ते लाल रंगाची असून दाण पांढरट ते फिक्‍कट गुलाबी असतात. शेतक-यांनी रोपापासून बागा लावल्‍यामुळे झाडांच्‍या वाढीत व फळांच्‍या गुणधर्मात विविधता ाढळते. चवीस हा वाण चांगला असून उत्‍पादनही भरपूर येते.
मृदुला, जी १३७, फुले आरक्‍ता, भगवा
डाळिंब लागवड कशी करावी?
डाळिंब लागवडिकरिता निवडलेली जमिन उन्‍हाळयामध्‍ये 2 ते 3 वेळेस उभी आडवी नांगरटी करुन कुळवून सपाट करावी. भारी जमिनीत 5 × 5 मिटर अंतरावर लागवड करावी. त्‍यासाठी 60 × 60 × 60 सेमी आकाराचे खडडे घ्‍यावेत. प्रत्‍येक खडयाशी तळाशी वाळलेला पालापाचोळयाचा 15 ते 20 सेमी जाडीचा थर देऊन 20 ते 25 किलो शेणखत किंवा कंपोस्‍ट खत, 1 किलो सिंगल सुपरफॉस्‍फेट यांच्‍या मिश्रणाने जमिनी बरोबर भरुन घ्‍यावेत. सर्वसाधारणपणे पावसाळयात लागवड करावी. डाळिंबाची तयार केलेली कलमे प्रत्‍येक खडयात एक याप्रमाणे लागवड करावी. कलमाच्‍या आधारासाठी शेजारी काठी पुरुन आधार द्यावा. कलम लावल्‍यानंतर त्‍याच बेताचे पाणी द्यावे. लागवडीनंतर सुरुवातीच्‍या काळात आवश्‍यकतेनुसार पाणी द्यावे. 5×5 मीटर अंतराने प्रती हेक्‍टरी 400 झाडे लावावीत.
डाळींब पिकास पाणी कसे द्यावे ?
डाळींब पिकास फुले येण्‍यास सुरुवात झााल्‍यानंतर फळे उतरुन घेईपर्यंतच्‍या काळात नियमित व पुरेसे पाणी देणे महत्‍वाचे आहे. पाणी देण्‍यात अनियमितपणा झाल्‍यास फुलांची गळ होण्‍याची शक्‍यता असते. फळांची वाढ होत असतांना पाण्‍याचा ताण पडून नंतर एकदम भरपूर पाणी दिल्‍यास फळांना तडे पडतात व प्रसंगी अशी न पिकलेली फळे गळतात. पावसाळयात पाऊस न पडल्‍यास जरुरीप्रमाणे पाणी द्यावे व पुढे फळे निघेपर्यंत 8 ते 10 दिवसांच्‍या अंतराने पाण्‍याची पाळी द्यावी. फळाची तोडणी संपल्‍यानंतर बागांचे पाणी तोडावे.
डाळींबावरील आरोह (मर) रोगाची लक्षणे काय आहेत?
या रोगाची पिकांच्‍या मुळावर वाढणारे हानीकारक फयूजेरीयम व रायजोक्‍टोनिया बुरशी आणि गाठी करणा-या सूत्रकृमी अशी दोन महत्‍वाची कारणे आहेत. मध्‍यम ते भारी जमिनीत लावलेल्‍या डाळींबाच्‍या बागेस वरचेवर पाणी दिल्‍यास किंवा ठिबक सिंचनाव्‍दारे सतत मुळांचा परिसर ओलसर राहिल्‍यामुळे तेथे सूत्रकृमीचा उपद्रव होतो. सुत्रकृमी अतिसूक्ष्‍म जीव असून त्‍याची नर आणि पिल्‍ले सापासारखी लांबट तर मादी गोलाकार अशी असते. या सूत्रकृमी फळांच्‍या मुळावर असंख्‍य जखमा करतात. आणि मुळातूनच अन्‍न मिळवितात. या जखमा असलेल्‍या पेशी मोठया होवून त्‍या गाठीच्‍या रुपात दिसतात. झाडांची मुळे तपकिरी रंगाची होतात. याचा झाडांच्‍या अन्‍नग्रहन क्षमतेवर विपरीत परिणाम होवून वाढ खुंटते. सूत्रकृमीने केलेल्‍या जखमातून फयूजोरियम सारख्‍या मुळ कुजवणारी बुरशी मुळात शिरुन वाढीस लागते. ही बुरशी हळू हळू मुळाची साल आणि मुळे कुजवते. त्‍यामुळे झाडांना पुरेसा अन्‍नपूरवठा होण्‍यास अडथळा निर्माण होतो.
सुरुवातीस डाळींबाचे झाड निस्‍तेज दिसते. झाडांची पाने पिवळी पडतात, फळांची गळती होते, काही फांदया पूर्णपणे वाळतात. आणि काही दिवसांनी संपूर्ण झाड वाळते
डाळिंब लागवडी करता हवामान कसे असावे?
डाळींबाचे पिकास थंड व कोरडे हवामान उपयुक्‍त आहे. उन्‍हाळयातील कडक ऊन आणि कोरडी हवा तसेच हिवाळयातील कडक थंडी डाळिंबाच्‍या वाढीस योग्‍य असते. अशा हवामानात चांगल्‍या प्रतीची फळे तयार होतात परंतु अशा प्रकारच्‍या हवामानात जरी थोडा फार फरक झाला तरी सुध्‍दा डाळिंबाचे उत्‍पन्‍न चांगले येते. फुले लागल्‍यापासून फळे होईपर्यंतच्‍या काळात भरपूर उन व कोरडे हवामान असल्‍यास चांगल्‍या प्रकारची गोड फळे तयार होतात. कमी पावसाच्‍या प्रदेशात जेथे थोडीफार ओलीताची सोय आहे तेथे डाळींबाच्‍या लागवडीस भरपूर वाव आहे.
डाळिंब लागवडी करता जमीन कशी असावी?
डाळिंबाचे पिक कोणत्‍याही जमिनीत घेण्‍यात येते. अगदी निकस, निकृष्‍ठ जमिनीपासून भारी, मध्‍यम काळी व सुपीक जमिन डाळींबाच्‍या लागवडीसाठी चांगली असते, मात्र पाण्‍याचा चांगला निचरा होणारी गाळाची किंवा पोयटयाची जमिन निवडल्‍यास उत्‍पन्‍न चांगले मिळते. त्‍याचप्रमाणे हलक्‍या, मुरमाड माळरान किंवा डोंगर उताराच्‍या जमिनीसुध्‍दा या पिकाला चालतात. मात्र जमिनीत पाण्‍याचा निचरा होणे आवश्‍यक आहे. चुनखडी आणि थोडया विम्‍लतायुक्‍त (अल्‍कलाईन) जमिनीतही डाळिंबाचे पीक येऊ शकते.
डाळिंब पिकाचा कोणता बहार धरावा?
डाळींबाच्‍या झाडास तीन बहार येतात. आंबिया बहार. मृग बहार हस्‍तबहार यापैकी कोणत्‍याही एका बहाराची फळे घेणे फायदेशिर असते. आंबियाबहार धरणे अधिक चांगले कारण फळांची वाढ होताना व फळे तयार होताना हवा उष्‍ण व कोरडी राहते. त्‍यामुळे फळास गोडी येते. फळांवर किडीचा व रोगाचा प्रादुर्भाव कमी होतो. पाण्‍याची कमतरता असल्‍यास मृगबहार धरावा.
फळांची तोडणी
डाळींबाचे फळ तयार होण्‍यास फूले लागण्‍यापासून साधारणतः 6 महिने लागतात. आंबिया बहाराची फळे जून ते ऑगस्‍ट मध्‍ये मृगबहाराची फळे नोव्‍हेबर ते जानेवारीमध्‍ये आणि हस्‍तबहाराची फळे फेब्रूवारी ते एप्रिल मध्‍ये तयार होतात. फळांची साल पिवळसर करडया रंगाची झाली म्‍हणजे फळ तयार झाले असे समजावे व फळाची तोडणी करावी.
डाळिंब या पिकावर फळे पोखरणारी आळी (सुरसा) साल पोखरणारी आळी, लाल कोळी, देवी किंवा खवले किड या किडीचा व फळावरील ठिपके फळकुज (फ्रूट रॉट) या रोगाचा प्रादुर्भाव कमी / अधिक प्रमाणात आढळून येत आहे. सध्‍या डाळिंब बागायतदारासाठी हा एक चिंतेचा विषय बनलेला आहे. राज्‍यात सांगोला, पंढरपूर, बारामती, जत, सटाणा, मालेगांव, देवळा या तालुक्‍यात या रोगाचे प्रमाण अधिक आहे. या बाबत कृषी विद्यापीठ स्‍तरावरुन शास्‍त्रज्ञांनी पाहाणी केली असून त्‍या बाबतची माहिती खालील प्रमाणे आहे.