*सुदृढ आरोग्यासाठी परेसाबागेत पोषण बाग पिकवा – ना.सौ.राजश्रीताई घुले पाटील*
- admin
- 0
- Posted on
*सुदृढ आरोग्यासाठी परेसाबागेत पोषण बाग पिकवा – ना.सौ.राजश्रीताई घुले पाटील*
*दहिगाव-ने कृषि विज्ञान केंद्रात “राष्ट्रीय पोषण दिन” कार्यक्रम साजरा*
*दहिगाव-ने (दि.१७):-* श्री. मारुतराव घुले पाटील शिक्षण संस्था कृषि विज्ञान केंद्र, दहिगाव-ने च्या वतीने दि.१७ सप्टेंबर २०२२ रोजी “राष्ट्रीय पोषण दिन” कार्यक्रम संपन्न झाला. यावेळी कार्यक्रमाच्या अध्यक्ष पदावरून बोलताना ना.सौ.राजश्रीताई घुले पाटील, अध्यक्षा, जिल्हा परिषद अहमदनगर यांनी पोषण आणि आहार जागृतीबाबत महिलांची भूमिका महत्वाची असल्याचे सांगितले. कुटुंबाच्या सुदृढ आरोग्यासाठी परसाबागेत पोषण बाग पिकविण्याचे आवाहन त्यांनी उपस्थित महिलांना केले. बचत गटाच्या माध्यमातून कुटुंबाला हातभार लावणाऱ्या महिलांचे कौतुक देखील त्यांनी केली.
या कार्यक्रमाला रोटरी इनर व्हील च्या संस्थापिका अध्यक्षा डॉ. मनीषा लड्डा, समाज विकास सेवा समिती नेवासा च्या सिस्टर बिंदू जोसेफ, इफको अहमदनगर चे महाप्रबंधक डी. बी. देसाई, पंचायत समिती शेवगाव बचत गट विभागाचे प्रभाग समन्वयक दीपक अवंतकर व दिनेश काशिद तसेच दहीगाव-ने गावचे सरपंच सुभाष पवार, उपसरपंच राजाभाऊ पाऊलबुद्धे, कृषि विज्ञान केंद्राचे प्रमुख व वरिष्ठ शास्त्रज्ञ डॉ. श्याम सुंदर कौशिक व्यासपीठावर उपस्थित होते.
कार्यक्रमाच्या प्रास्ताविकामध्ये डॉ. कौशिक यांनी पाचवा राष्ट्रीय पोषण अभियान २०२२ कार्यक्रमाची थीम महिला आणि स्वास्थ्य व बच्चा आणि शिक्षा चे विवरण करताना, पिकांच्या जैवसंपृक्त वाणांचे महत्त्व विषद केले. केव्हीके दहीगाव-ने मार्फत शेतकरी व शेतकरी महिलांसाठी राबविण्यात येणा-या कार्यक्रमांची माहिती उपस्थित शेतकरी व महिलांना त्यांनी दिली. महिलांमध्ये जीवनसत्त्वाच्या कमतरतेमुळे होणारे आजार आणि ते आजार होऊ नये म्हणून, संतुलित आहार कसा असावा तसेच आपला आहार पोषक व्हावा, संतुलित व्हावा याकरता सद्य दैनंदिन आहारमध्ये काय बदल केले पाहिजे याविषयी डॉ. मनीषा लड्डा यांनी उपस्थित महिलांना मार्गदर्शन केले. आरोग्य आणि संतुलित आहाराचे महत्व इफको चे महाप्रबंधक डी. बी. देसाई यांनी उपस्थित महिलांना सांगितले. पाचव्या “राष्ट्रीय पोषण दिन” कार्यक्रम निमित्ताने भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी व केंद्रीय कृषिमंत्री नरेंद्रसिंह तोमर यांनी ऑनलाईन दूरदृश्यप्रणाली माध्यमातून उपस्थित महिलांना मार्गदर्शन केले.
या कार्यक्रमाच्या दरम्यान उपस्थित महिलांना इफको व महाबीज कंपनीचे भाजीपाला बियाणे कीट व शेवगा रोपे परसबागेच्या जोपासनेसाठी कृषि विज्ञान केंद्र, दहिगाव-ने व शेवगाव पंचायत समिती च्या मार्फत वाटप करण्यात आले. तसेच मान्यवरांच्या हस्ते केव्हीके प्रक्षेत्रावर वृक्षारोपण करण्यात आले. या कार्यक्रमाला केव्हीके दहिगाव-ने चे शास्त्रज्ञ नंदकिशोर दहातोंडे, राहुल पाटील, प्रकाश हिंगे, अनिल देशमुख, प्रविण देशमुख, दत्तात्रय वंजारी, संजय थोटे व गणेश घुले तसेच मोठ्या संख्येने महिला शेतकरी उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केव्हीके चे शास्त्रज्ञ नारायण निबे यांनी केले तर आभार सचिन बडधे यांनी मानले.