कपाशी पिकावरील गुलाबी बोंड आळी व्यवस्थापन
- admin
- 0
- Posted on
कपाशी पिकावरील गुलाबी बोंड आळी व्यवस्थापन _
अहमदनगर जिल्ह्यामध्ये काही शेतकऱ्यांच्या वेळेवर लागवड झालेल्या कपाशीला फुले, बोंडे लागली असून त्यावर गुलाबी बोंडअळीचा प्रादुर्भाव आढळून येत आहे. सद्या वातावरण ढगाळ असल्याने व कापसाला पाते, फुले व काही प्रमाणात बोंडे लागत असल्याने गुलाबी बोंडअळीचे पतंग सक्रीय झालेले आढळून येत आहे. मादी पतंग पाते, फुले, बोंडे यावर अंडी घालतात, तसेच यावर्षी कपाशी पिकाची लागवड एकाच वेळी न होता टप्याटप्याने झालेली आहे, त्यामुळे किडीला सतत खाद्य उपलब्ध होत असल्याने गुलाबी बोंड अळीचा प्रादुर्भाव वाढण्याची शक्यता आहे. म्हणून कपाशीच्या पिकात कामगंध सापळे लावण्याची ही योग्य वेळ आहे जेणेकरून होणारा प्रादुर्भाव आतापासूनच निरीक्षणाद्वारे कमी करता येईल आणि पुढे होणारे नुकसान कमी करता येईल.
उपाय योजना : कपाशीच्या पिकात नियमित सर्वेक्षण करुन डोमकळ्या दिसून आल्यास त्या आतील अळीसह तोडून जमा करून जाळून अथवा जमिनीत पुरून नष्ट कराव्यात. गुलाबी बोंडअळीसाठीचे कामगंध सापळे हेक्टरी ५ या प्रमाणात पिकाच्या उंचीच्या एक ते दीड फूट उंच लावावीत़. मोठ्या प्रमाणात पतंग जमा करून नष्ट करण्यासाठी एका एकर क्षेत्रामध्ये गुलाबी बोंडअळीचे ८ ते १० कामगंध सापळे लावावेत.
कपाशीचे शेतात पक्षांना बसण्यासाठी हेक्टरी किमान २५ पक्षी थांबे लावावेत, म्हणजे पक्षी त्यावर बसून शेतातील अळया खाऊन नष्ट करतील. ५ टक्के निंबोळी अर्क किंवा अझाडिरेक्टीन १५०० पीपीएम ५०० मिली किंवा बिव्हेरिया बॅसियाना या बुरशीयुक्त जैविक कीटकनाशकाची जमिनीत ओल व हवेत आर्द्रता असताना ८०० ग्रॅम प्रति एकर याप्रमाणात फवारणी करावी.
कामगंध सापळ्यामध्ये सलग तीन दिवस ८ ते १० पतंग प्रति सापळा किंवा १ अळी प्रति १० फुले किंवा १० बोंडे किंवा १० टक्के प्रादुर्भावग्रस्त डोमकळ्या किंवा बोंडे दिसून आल्यास पुढील पैकी एका रासायनिक कीटकनाशकांची ची फवारणी करावी.
प्रोफेनोफॉस ५० टक्के ४०० मिली प्रती एकर किंवा इमामेक्टिन बेंझोएट ५ टक्के ८८ ग्रॅम प्रती एकर किंवा प्रोफेनोफोस ४० टक्के अधिक सायपरमेथ्रीन ४ टक्के (पूर्व मिश्रित कीटकनाशक) ४०० मिली प्रती एकर आलटून पालटून फवारावे. या कीटकनाशकासोबत कुठल्याही प्रकारचे इतर कीटकनाशके, बुरशीनाशके, विद्राव्य खते, सूक्ष्म मूलद्रव्ये अथवा रसायने मिसळू नये.
डोमकळी
कामगंध सापळा