*कृषि विज्ञान केंद्र, दहीगाव-ने यांच्या वतीने जागतिक महिला दिन संपन्न*
- admin
- 0
- Posted on
श्री मारुतराव घुले पाटील शिक्षण संस्थेचे कृषि विज्ञान केंद्र, दहीगाव-ने यांच्या वतीने गिडेगाव ता. नेवासा येथे जागतिक महिला दिन या निमित्ताने महिला किसान गोष्टी कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी उपस्थित महिलांना विविध विषयांवर मार्गदर्शन करण्यात आले व त्यांचा सन्मान देखील करण्यात आला.
दिनांक ८ मार्च रोजी संपूर्ण जगभरामध्ये जागतिक महिला दिन म्हणून साजरा करण्यात येतो. संयुक्त राष्ट्र संघटनेद्वारे या वर्षी ‘उद्याच्या शाश्वत भविष्यासाठी स्त्री-पुरुष समानता’ ही संकल्पनेवर आधारित महिला दिन साजरा करण्यात आला. भारतीय कृषी अनुसंधान परिषद, नवी दिल्ली यांच्या माध्यमातून ‘ज्ञान व कौशल्य याद्वारे महिलांचे सक्षमीकरण’ या संकल्पनेवर कृषि विज्ञान केंद्रांचे माध्यमातून जागतिक महिला दिन साजरा करण्यात आला. कार्यक्रमाचे अध्यक्ष गिडेगाव उपसरपंच श्री. दादा पा. कर्डिले हे होते. यावेळी प्रमुख मार्गदर्शक म्हणून डॉ. श्यामसुंदर कौशिक, प्रमुख आणि वरिष्ठ शास्त्रज्ञ यांनी उपस्थित महिलांना मार्गदर्शन केले. डॉ कौशिक यांनी शेती व आदर्श गृहिणी म्हणून काम करतांना येणाऱ्या विविध अडचणी त्यावरील उपाययोजना, महिलांचे आरोग्य, धान्याची साठवण, कृषि विज्ञान केंद्राची महिलांबद्दलची भूमिका, शेती क्षेत्रामधील महिलांचे महत्व याबद्दल सविस्तर मार्गदर्शन केले. श्री. नंदकिशोर दहातोंडे यांनी परसबागेतील भाजीपाला याबद्दल तर श्री नारायण निबे यांनी कडधान्याचे अधिक उत्पादन घेण्याचे तंत्र व त्यांचे आरोग्यातील महत्व याबद्दल मार्गदर्शन केले. श्री प्रकाश बहिरट यांनी विविध पिकांसाठी बिजप्रक्रीया करण्याचे कृतीसह महत्व समजून सांगितले. यावेळी समाज विकास समितीच्या संचालिका श्रीमती बिंदू जोसेफ, गावचे पोलीस पाटील श्री बाळासाहेब साळुंके, मुळा कारखान्याचे संचालक श्री कडूभाऊ गायकवाड, पत्रकार मंगेश निकम, श्री उत्तमराव गायकवाड, शशिकांत क्ष्रीरसागर व पंचक्रोशीतील महिला मोठ्या संखेने उपस्थित होत्या. यावेळी गावामध्ये एकूण २१ स्वयांसहायता गटाच्या माध्यमातून काम करणाऱ्या गटांमधून उत्कृष्ट काम करणारे गट म्हणून कृपा व जीवनज्योती स्वयांसहायता गटाच्या करिता सौ. कल्पना गायकवाड व सौ. ज्योती गायकवाड यांचा सन्मान व सत्कार करण्यात आला. तर सक्रीय सदस्या म्हणून पूजा गायकवाड व ज्याती साळुंखे यांचा कृषि विज्ञान केंद्राच्या माध्यमातून सन्मान व सत्कार करण्यात आला. याच निमित्ताने सलबतपूर मंडळाचे मंडळ कृषि अधिकारी श्री मनोज सूर्यवंशी यांनी उपस्थित राहून महिलांच्या अनुषंगाने कृषि विभागाच्या योजनांबद्दल मार्गदर्शन केले. कार्यक्रमाचे कार्यक्रमाचे नियोजन व सूत्रसंचालन श्री सचिन बडधे यांनी केले. कार्यक्रमाचे शेवटी उपस्थित सर्व महिलांना ड्रॅगन फ्रुट ची रोपे प्रदान करण्यात आली.
Read more