हरभरा पिक : वारंवार विचारले जाणारे प्रश्न (Frequently Asked Questions)
- admin
- 0
- Posted on
हरभरा पिक : वारंवार विचारले जाणारे प्रश्न (Frequently Asked Questions)
कोणत्या हरभ-याच्या जाती मर प्रतिकारक्षम असतात?
विजय, विशाल, दिग्विजय, विराट, जाकी ९२१८, पी.के.व्ही. २, पी.के.व्ही. ४, बि.डी.एन.जी. ७९७, फुले विक्रम , फुले विक्रांत पी.डी.के.व्ही. कांचन , पी.के.व्ही. हरिता (ए.के.जी. ९३०३-१२), राज विजय २०२ , राज विजय-२०३ (जे.एस.सी. 56), या मर प्रतिकारक्षम जाती आहेत.
उशीरा पेरणीसाठी हरभ-याच्या कोणत्या जाती योग्य आहेत?
विजय, दिग्विजय, फुले विक्रम, राज विजय-२०२ (जे.एस.सी. 55), राज विजय-२०३(जे.एस.सी. 56) या उशीरा पेरणीसाठी योग्य जाती आहेत.
काबुली हरभ-याच्या नव्याने प्रसारित जाती कोणत्या?
विराट , कृपा या नव्याने प्रसारित झालेल्या जाती आहेत.
यांत्रिक पध्दतीने काढणी करण्यायोग्य हरभ-याच्या जाती कोणत्या?
फुले विक्रम हि यांत्रिक पध्दतीने काढणी करण्यायोग्य जात आहे.
हरभरा उत्पादन तंत्रज्ञानाशी संबंधित वारंवार विचारले प्रश्न
हरभरा लागवडीसाठी कोणत्या मातीचा प्रकार योग्य आहे?
हरभरा पिकासाठी मध्यम ते भारी काळी कसदार ( ४५ ते ६० से.मी. व चांगल्या नीच-याची जमीन योग्य आहे.
हरभरा पिकास शिफारशीत खत मात्रा काय आहे?
प्रति हेक्टरी २५ किलो नत्र, ५० किलो स्फुरद, ३० किलो पालाश आणि २५ किलो गंधकाचा वापर करावा. जिरायत परिस्थितीत 2% युरिया किंवा डाय-अमोनियम फॉस्फेट (डीएपी) ची फवारणी घाटे भरण्याच्या अवस्थेत करावी. जास्त उत्पादन मिळावे यासाठी जस्त या सूक्ष्ममुलद्रव्याचा २५ किलो प्रति हेक्टर वापर करावा.
हरभरा बियाण्यास कोणती बीजप्रक्रिया करावी?
मर आणि कोरडी मूळकुज रोगांचे नियंत्रण करणेसाठी २.५ ग्रॅम थायरम किंवा १ ग्रॅम बाविस्टीन किंवा १.५ ग्रॅम थायरम + ०.५ ग्रॅम बाविस्टिन प्रति किलो बियाणे या प्रमाणात बीजप्रक्रीया करावी.
रायझोबियमची बीजप्रक्रीया करण्याची योग्य पद्धत काय आहे?
रायझोबियम (२५०ग्रॅम) प्रति १० किलो बियाणे या प्रमाणात प्रक्रीया करावी. यासाठी १०० ग्रॅम गूळ ५०० मिली पाण्यात मिसळून हे द्रावण उकळून थंड करावे. त्यात रायझोबियम जिवाणू संवर्धक मिसळावे व हे मिश्रण १० किलो बियाण्यास चोळावे जेणेकरून सर्व बियाण्यांस पातळ थर बसेल.पेरणीपूर्वी बियाणे सावलीत वाळवावे.
पेरणीसाठी बियाणाचे हेक्टरी प्रमाण किती असावे?
टपोरे दाणे असलेल्या वाणाचे प्रति हेक्टरी ८०-८५ किलो, तर लहान दाणे असलेल्या वाणाचे प्रति हेक्टरी ६०-६५ किलो या प्रमाणात बियाणे वापरावे. उशीरा पेरणी करावयाची असल्यास २०-२५% जास्त बियाणे वापरावे.
हरभरा पिकात तण नियंत्रण कसे करावे?
पिकाच्या जोमदार वाढीसाठी शेत सुरुवातीपासूनच तण विरहित ठेवावे. पिक २० दिवसांचे झाल्यानंतर पहिली कोळपणी करावी आणि एक महिन्याचे असताना दुसरी कोळपणी करावी. पेरणीनंतर पिक व गावात उगवणीपूर्वी ७० ते १०० मी.ली. पेंडीमेथॅलीन किंवा ८ ते १० मिली ऑक्सीफ्लोरफेन प्रति १० लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी.
मुख्य रोग आणि त्यांच्या व्यवस्थापनाशी संबंधित वारंवार विचारले जाणारे प्रश्न
देशात हरभरा पिकावर आढळणारे महत्त्वाचे रोग कोणते?
मर, कोरडी मूळकुज, मानकुजव्या, एस्कोकायटा ब्लाइट आणि बोट्रीटीस ग्रे मोल्ड हे हरभरा पिकाचे मुख्य रोग आहेत.
हरभरा पिकामध्ये मर रोगाचे व्यवस्थापन कसे करावे ?
कार्बेंडाझिम (बाविस्टीन) ३ ग्रॅम किंवा कार्बॉक्सिन + थायरम २ ग्रॅम किंवा ट्रायकोडर्मा व्हीरिडी ४ ग्रॅम प्रति किलो या प्रमाणात बीजप्रक्रीया करावी. त्यामुळे रोपांचे सुरुवातीच्या काळात रोगापासून संरक्षण होते.त्याचप्रमाणे, बेंनलेट ( बेनोमिल +३०% + थायरम ३०% ) १. ५ ग्रॅम प्रति किलो बीजप्रक्रीया केल्यास जमिनीद्वारे प्रसार होणाऱ्या रोगापासून चांगल्या प्रकारे संरक्षण मिळते.
हरभरा पिकावर येणाऱ्या कोणत्या रोगांच्या व्यवस्थापनासाठी बीजप्रक्रीया करावी?
हरभरा पिकावर येणाऱ्या मर, कोरडी मूळकुज आणि मानकुजव्या रोगांच्या व्यवस्थापनासाठी बीजप्रक्रीया करावी.
कृषिविद्या विभाग,
श्री. मारुतराव घुले पाटील शिक्षण संस्थेचे,
कृषि विज्ञान केंद्र, दहिगाव ने ,
ता. शेवगाव जि. अहमदनगर
संपर्क : (०२४२९)-२७२०२०