आय सी ए आर अटारी पुणे व कृषि विज्ञान केंद्र दहिगाव ने यांच्या वतीने कडधान्य आत्मनिर्भरता अभियान अंतर्गत निरीक्षण भेट व शेतकरी शास्त्रज्ञ परिसंवाद कार्यक्रम संपन्न
- admin
- 0
- Posted on
*आय सी ए आर अटारी पुणे व कृषि विज्ञान केंद्र दहिगाव ने यांच्या वतीने कडधान्य आत्मनिर्भरता अभियान अंतर्गत निरीक्षण भेट व शेतकरी शास्त्रज्ञ परिसंवाद कार्यक्रम संपन्न*
*डॉ. सय्यद शाकिर अली यांची कडधान्य आत्मनिर्भरता अभियान अंतर्गत निरीक्षण भेट*
श्री मारुतराव घुले पाटील शिक्षण संस्थेचे अध्यक्ष मा.आ.डॉ. नरेंद्र घुले पाटील उपाध्यक्ष मा.आ.चंद्रशेखर घुले पाटील व सर्व संचालक मंडळ यांच्या मार्गदर्शनाखाली कृषी विज्ञान केंद्र दहिगाव ने काम करत आहे.
कृषि विज्ञान केंद्र दहिगाव ने अंतर्गत कडधान्य आत्मनिर्भरता अभियान उडीद या पिकामध्ये वांजोळी तालुका नेवासा येथे ५८.५ एकर क्षेत्रावर ५५ शेतकऱ्यांच्या शेतावर तर तुर पिकामध्ये मंगळूर, कोळगाव तालुका शेवगाव, नान्नज व चोभेवाडी तालुका जामखेड या ठिकाणी २२६ एकर क्षेत्रावर १५७ शेतकऱ्यांच्या शेतावर समूह आद्यरेषा पिक प्रात्यक्षिके राबविण्यात आले. या अभियानांतर्गत शेतकऱ्यांना सुधारित वाणाचे बियाणे, रासायनिक व जैविक बीज प्रक्रियेचे साहित्य, तणनाशक, किड व रोग नाशके, फेरोमन सापळे इत्यादी साहित्य देण्यात आले आहे.
कडधान्य आत्मनिर्भरता अभियान अंतर्गत निरीक्षण भेट व शेतकरी शास्त्रज्ञ परिसंवाद कार्यक्रमाचे आयोजन मौजे वांजोळी व मंगळूर या ठिकाणी करण्यात आले होते. या कार्यक्रमासाठी आय सी ए आर अटारी झोन ८ चे प्रमुख शास्त्रज्ञ डॉ. सय्यद शाकीर अली उपस्थित होते.
या अभियानांतर्गत राबविण्यात आलेल्या समूह आद्यरेषा पिक प्रात्यक्षिकास तज्ञांनी भेट दिली व उपस्थित शेतकऱ्यांना मार्गदर्शन केले. याप्रसंगी डॉ. सय्यद शाकीर आली यांनी कडधान्य पिकामध्ये आत्मनिर्भर होण्यासाठी राबविण्यात येणाऱ्या अभियानाचे महत्त्व सांगितले. केंद्र व राज्य शासनामार्फत राबविण्यात येणाऱ्या या अभियानाचे मुख्य उद्दिष्ट हे कडधान्य पिकांमध्ये आपला देश स्वयंपूर्ण व्हावे हे असून याप्रसंगी त्यांनी शेतकऱ्यांनी शेती व्यवसाय करताना पारंपारिक पद्धतीने न करता एक उद्योजक म्हणून शेती व्यवसायाकडे बघण्याची गरज असल्याचे नमूद केले.
याप्रसंगी बोलताना कृषि विज्ञान केंद्राचे प्रमुख वरिष्ठ शास्त्रज्ञ डॉ. श्यामसुंदर कौशिक यांनी कृषि विज्ञान केंद्राअंतर्गत राबविण्यात येणाऱ्या वेगवेगळ्या उपक्रमाविषयी शेतकऱ्यांना माहिती दिली तसेच सद्यस्थितीमध्ये वेगवेगळ्या पिकांमध्ये करावयाच्या उपाययोजनांविषयी शेतकऱ्यांना जागृत केले. याप्रसंगी प्रगतशील शेतकऱ्यांनी आपले मनोगत व्यक्त केले. या कार्यक्रमासाठी वांजोळी गावचे सरपंच श्री. आप्पासाहेब खंडागळे, मंगळूर गावचे सरपंच श्री. बाळासाहेब विघ्ने, कुशाबा विघ्ने, चंद्रकांत झिरपे, शिवाजी येळवंडे, नवनाथ पागिरे, नाना सुद्रुक, किशोर खंडागळे व सहाय्यक कृषि अधिकारी यांच्यासह शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते. या कार्यक्रमासाठी कृषि विज्ञान केंद्राचे माणिक लाखे, डॉ.चंद्रशेखर गवळी, प्रकाश बहिरट, प्रकाश हिंगे, अनिल देशमुख, प्रवीण देशमुख, संजय थोटे, गणेश घुले, दत्तात्रय वंजारी, धनंजय भूमकर, सागर ढिसले, राम लांडगे व मोठ्या संखेने शेतकरी उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन इंजिनीयर राहुल पाटील यांनी केले तर आभार नंदकिशोर दहातोंडे यांनी मांडले.